इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. हे सामने युएईमध्ये पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती, ज्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने तत्काळ बैठक घेत ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा स्थगित करण्यात आली त्यावेळी २९ सामने झाले होते. उर्वरित ३१ सामने हे दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.
दरम्यान या स्पर्धेतील पहिलीच लढत ५ वेळेस आयपीएल स्पर्धेचे विजेते मुंबई इंडियन्स आणि ३ वेळेस आयपीएल स्पर्धचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये रंगणार आहे. तत्पूर्वी जाणून घेऊया, कशी राहिली आहे चेन्नईच्या फलंदाजांची मुंबईच्या गोलंदाजांविरुद्ध कामगिरी?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांची लढत म्हणजे जणू भारत-पाकिस्तान सामनाच असतो. या दोन्ही संघांमध्ये जेव्हा सामना रंगतो, तेव्हा चाहते देखील ही लढत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणे स्वाभाविक आहे. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना या दोघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे.
रैनाने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण ३३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने सर्वाधिक ८२० धावा केल्या आहेत. तर कर्णधार धोनीने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध ३६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ६७९ धावा करण्यात यश आले आहे. या दरम्यान रैनाने ३०.३७ आणि धोनीने ३३.९५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
तसेच वर्तमान संघात रैना आणि धोनीनंतर मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध सर्वधिक धावा करण्याचा पराक्रम फाफ डू प्लेसीने केला आहे. फाफ डू प्लेसीने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध १५ सामन्यात २४.७८ च्या सरासरीने ३४७ धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी ड्वेन ब्रावो आहे. ब्रावोने चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करताना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध एकूण १९ सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने २१.६१ च्या सरासरीने २८१ धावा केल्या आहेत. तर पाचव्या स्थानी रवींद्र जडेजा आहे. जडेजाने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळताना आतापर्यंत २९ सामन्यात १८.७३ च्या सरासरीने २८१ धावा केल्या आहेत.
तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघातील मध्यक्रमातील फलंदाज अंबाती रायुडू या यादीत सहाव्या स्थानी आहे. रायुडूने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३६.५७ च्या सरासरीने २५६ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध फलंदाजी करताना त्याची सरासरी ही धोनी पेक्षा देखील जास्त आहे. तसेच रायुडूने सुरुवातीच्या काही हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गज खेळाडूला धोनीने आधीच सांगितले “तुझी सीएसके प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनत नाही”