क्रिकेटमधील यावर्षीचे सर्व सामने पार पडले आहेत. या वर्षी अनेक फलंदाजांनी मोठे विक्रम केले आहेत. यात टॉम लॅथमने यावर्षी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
यावर्षी सर्वाधिक कसोटी सामने भारतीय संघाने खेळले आहेत. त्यांनी 14 कसोटी सामने खेळले. त्यांच्या पाठोपाठ इंग्लंडने 13 सामने खेळले. तर याचवर्षी अफगाणीस्तान आणि आयर्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे हे वर्ष कसोटी क्रिकेटसाठी खास ठरले आहे.
2018 वर्षांत कसोटीत सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज –
1. विराट कोहली – 2018 या वर्षात विराटने 13 कसोटी सामन्यात खेळताना 24 डावात 55.08 च्या सरासरीने 1322 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. तो कसोटीमध्ये सलग दुसऱ्यावर्षी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
त्याने यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियनमध्ये केलेली 153 धावांची धावसंख्या त्याची या वर्षातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली आहे. विशेष म्हणजे विराटने यावर्षी 1138 कसोटी धावा या परदेशात केल्या आहेत.
2. कुसल मेंडिस – श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज कुसल मेंडीस हा विराट नंतरचा यावर्षीचा कसोटीत 1000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. श्रीलंका संघाची कामगिरी जरी 2018 या वर्षात खास झालेली नसली तरी मेंडिसने चांगली फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
23 वर्षीय मेंडीसने नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 141 धावांची शतकी खेळी करत श्रीलंकेला पराभवापासून वाचवले आहे. त्याने यावर्षी 12 कसोटी सामन्यात 46.50 च्या सरासरीने 1023 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याने जानेवारीमध्ये बांगलादेश विरुद्ध 196 धावांची केलेली खेळी त्याची यावर्षीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली आहे.
3. जो रुट – इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटसाठीही हे वर्ष खास ठरले आहे. मात्र त्याला यावर्षी कसोटीमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 52 धावा कमी पडल्या. त्याने 2018 या वर्षात 13 कसोटी सामन्यात 41.21 च्या सरासरीने 2 शतके आणि 6 अर्धशतकांच्या सहाय्याने 948 धावा केल्या.
त्याने 2018 यावर्षीचे पहिले शतक भारताविरुद्ध द ओव्हल मैदानावर केले. यात त्याने दुसऱ्या डावात 125 धावा केल्या होत्या. ही त्याची यावर्षीची कसोटीतील सर्वोत्तम खेळी ठरली. त्यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध 124 धावांची खेळी केली.
4. चेतेश्वर पुजारा – भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेला चेतेश्वर पुजाराने यावर्षी 13 सामन्यात 38.4 च्या सरासरीने 837 धावा केल्या. यात त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत.
त्याने भारताची सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत 2 शतके केली आहेत. तसेच त्याने ऑगस्टमध्ये इंग्लंड विरुद्धही शतक केले होते. त्याने साउथँप्टन कसोटीत इंग्लंड विरुद्ध नाबाद 132 धावांची खेळी केली होती. मात्र भारताला या कसोटीत पराभव स्विकारावा लागला होता. पण ही त्याची यावर्षीतील सर्वोत्तम खेळी ठरली.
तसेच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड आणि मेलबर्नमध्ये शतकी खेळी केली. या दोन्ही कसोटीत त्याची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. भारताने या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.
5. जॉस बटलर – इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉस बटलर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी इंग्लंडकडून 10 सामन्यात खेळताना 44.70 च्या सरासरीने 1 शतक आणि 6 अर्धशतकांसह 760 धावा केल्या आहेत.
त्याने यावर्षी केलेले एकमेव शतकही भारताविरुद्ध केले आहे. त्याने भारताविरुद्ध नॉटिंगघम कसोटीत दुसऱ्या डावात 106 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताने या सामन्यात 203 धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–बुमराहला २०१९मध्ये सर्वच मालिकेत मिळणार नाही संधी, जाणून घ्या कारण
–किंग कोहलीकडून यंग चाहत्याला क्रिकेट पॅड भेट, पहा व्हीडिओ
–२०१९मध्ये क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार हे तीन मोठे पराक्रम