क्रिकेटचा मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी. १९९८ साली आयसीसी नॉक आऊट टूर्नामेंट नावाने सुरु झालेली ही स्पर्धा नंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी नावाने ओळखली जाऊ लागली. २०१७ हे स्पर्धेचं ८व वर्ष असून फक्त ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे.
ख्रिस गेल
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फलंदाज म्हणून श्रीलंकन आणि भारतीय खेळाडू हे सर्वात जास्त यशस्वी ठरले आहेत. तरीही सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. १७ सामन्यांत खेळताना त्याने तब्बल ५२.७३ च्या सरासरीने ७९१ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतके आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे.
माहेला जयवर्धने
माहेला जयवर्धने हा आशियायी खेळाडूही या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेला फलंदाज. २२ सामन्यांत २१ डावात फलंदाजी करताना त्याने ७४२ धावा केल्या आहेत. एवढे सामने आणि धावा जरी जयवर्धनेने केल्या असल्या तरी त्याला या स्पर्धेत शतक नोंदविण्यात अपयश आले आहे. नाबाद ८४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
कुमार संगकारा
महिला जयवर्धनेचा संघसहकारी असलेला खेळाडू कुमार संगकारा हाही या स्पर्धेत जयवर्धने एवढेच म्हणजे २२ सामने खेळला. नाबाद १३४ ही सर्वोच्च धावसंख्या करताना स्पर्धेत २१ डावात त्याने ६८३ धावा फटकावल्या. त्याची सरासरी ही ३७.९४ राहिली आहे. १ शतक आणि ४ अर्धशतके ही कुमार संगकाराच्या नावावर आहेत.
२००२ ला चॅम्पियन्स ट्रॉफीला अंतिम फेरीत पोहचलेल्या संघात संगकारा होता.
सौरव गांगुली
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच आणि आयसीसीच्या स्पर्धांचं विशेष नातं आहे. या स्पर्धांत गांगुलीने कायमच आपला दबदबा फलंदाजी आणि कर्णधारपदातून दाखवून दिली आहे. २००२ ला भारत पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहचला होता. गांगुलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून १३ सामने खेळताना ६६५ धावा केल्या आहेत. नाबाद १४१ ही गांगुलीची सर्वोच्च धावसंख्या राहिली असून ३ शतके आणि तेवढीच अर्धशतके गांगुलीने केली आहेत. यात गांगुलीची ७३.८८ एवढी अफाट सरासरी राहिली आहे.
जॅक कॅलिस
जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असलेल्या जॅक कॅलिसने ह्या स्पर्धेतही आपली छाप सोडली आहे. १७ सामन्यांत खेळताना कॅलिसने ६५३ धावा केल्या असून त्यात ४६.६४ ची सरासरीही राखली आहे. त्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कॅलिसने फलंदाजीबरोबर गोलंदाजीमध्येही योगदान देताना १७ सामन्यांत २० बळीदेखील घेतले आहेत.