मंगळवारी(१० नोव्हेंबर) आयपीएल२०२० चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवत इतिहास रचला. या सामन्याबरोबर यंदाचा आयपीएल हंगामही संपला. त्यामुळे अखेर या हंगामाचा ऑरेंज कॅप विजेता खेळाडू मिळाला आहे. ऑरेंज कॅप ही आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते.
यंदाच्या आयपीएल हंगामाची ऑरेंज कॅप किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलला मिळाली आहे. त्याने या हंगामात १४ सामन्यात ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या पाठोपाठ यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिल्लीचा सलमीवीर शिखर धवन आहे. त्याने १७ सामन्यात ६१८ धावा केल्या.
#आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
१. केएल राहुल-
किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज केएल राहुलने यंदाचा हंगाम त्याच्या फलंदाजीने गाजवला. त्याने पंजाबकडून जवळपास सर्व सामन्यात मोठ्या धावा केल्या. त्याने या हंगामात ५५.८३ च्या सरासरीने १४ सामन्यात ६७० धावा केल्या. यात त्याच्या १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच तो यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
२. शिखर धवन – दिल्लीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन यंदाच्या आयपीएल हंगामातील ६०० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने या हंगामात सलग २ शतके करण्याचा पराक्रमही केला. त्याच्या बॅटमधून यंदा २ शतकांसह ४ अर्धशतके केली. त्याने १७ सामन्यात ४४.१४ च्या सरासरीने ६१८ धावा केल्या.
३. डेविड वॉर्नर – सनरायझर्स हैदराबादचा संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरचीही बॅट यंदाच्या हंगामात चांगलीच तळपली. त्याने या हंगामात ४ अर्धशतकांसह ३९.१४ च्या सरासरीने १६ सामन्यात ५४८ धावा केल्या. नाबाद ८५ धावा ही त्याची आयपीएल हंगामातील सर्वोत्तम खेळी ठरली.
४. श्रेयस अय्यर – दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने यंदाच्या आयपीएल हंगामात अनेकदा कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने अंतिम सामन्यातही ५० चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली. त्याने या हंगामात ५०० धावांचा टप्पाही पार केला आहे. त्याने या हंगामात १७ सामने खेळताना ३४.६० च्या सरासरीने ५१९ धावा केल्या. यात त्याच्या ३ अर्धशकांचा समावेश आहे. नाबाद ८८ धावा ही त्याची यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
५. ईशान किशन – मुंबई इंडियन्सचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने यंदाच्या आयपीएल हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्याने एका सामन्यात ९९ धावांची खेळीही केली. त्याचे पहिले आयपीएल शतक केवळ १ धावेने हुकले. या हंगामात त्याने ४ अर्धशतकांसह ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या आहेत.