सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेटमध्ये वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसतो. त्याला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये फारसं यश मिळालं नाही, परंतु तो टी20 क्रिकेटचा बादशाह आहे. सध्या तो भारताच्या टी20 संघाचा कर्णधारही आहे.
ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवनं मोठा विक्रम केला. त्यानं इंग्लंडचा दिग्गज जोस बटलरला मागे टाकलं. सूर्यकुमार यादव टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील चौथा फलंदाज बनला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यानं 3 षटकार ठोकले.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत. सिक्सर किंग हिटमॅननं 159 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 205 षटकार ठोकले. या यादीत दुसरं नाव आहे न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचं. त्यानं 122 सामन्यात 173 षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावरील निकोलस पूरननं 98 सामन्यात 144 षटकार ठोकले आहेत. आता 73 सामन्यात 139 षटकार मारत सूर्यकुमार यादव या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं 124 सामन्यांत 137 षटकार मारले असून तो चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला. सूर्यकुमार यादवचा फॉर्म पाहता तो पूरनला लवकरच मागे टाकू शकतो.
सूर्यकुमार यादवनं ग्वाल्हेरच्या न्यू माधव राव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध 14 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 29 धावांची शानदार खेळी खेळली. या डावात दुसरा षटकार ठोकताच तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत जोस बटलरच्या पुढे गेला. सूर्यकुमार यादवचा दमदार फॉर्म कायम असून तो सध्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांमध्ये तो अशीच कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर तो पुन्हा एकदा या फॉरमॅटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनेल.
हेही वाचा –
बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारताच्या नावे अनेक विक्रम! पॉवरप्लेमध्ये मोठा पराक्रम
INDW vs PAKW; हरमनप्रीत कौरच्या दुखापतीबद्दल स्म्रीती मानधनाची प्रतिक्रिया
IND vs BAN; भारताचा बांगलादेशवर 7 गडी राखून दमदार विजय!