वेणुगोपाल राव (Venugopal Rao) हे नाव भारतीय क्रिकेटरसिकांना कमी अधिक प्रमाणात माहित आहे. तो भारताकडून अशा जमान्यात खेळला, ज्या जमान्यात सेहवाग, सचिन, गांगुली, युवराज, द्रविड, धोनी, कैफ असे दिग्गज भारतीय संघात होते. आता इतक्या मोठ्या खेळाडूंसमवेत त्याला स्पर्धा करता आली नाही परंतु आपल्या छोट्याशा कारकीर्दीत त्याने प्रसिद्धी मात्र मिळवली.
रावने २००५-२००६ सालामध्ये भारतासाठी १८ एकदिवसीय सामने खेळले. यात २४ च्या सरासरीने २१८ धावा जमविल्या. त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. याआधी, वेणुगोपाल रावने एक अशी खेळी खेळली होती, ज्यामुळे तो निवडकर्त्यांच्या नजरेत आला आणि भारतीय संघासाठी खेळू शकला.
साल २००४ मध्ये दुलीप ट्रॉफी खेळली जात होती. त्यावेळी, दुलीप ट्रॉफीमध्ये एक प्रयोग करण्यात येत होता. दुलीप ट्राॅफीत दक्षिण, पूर्व, उत्तर, पश्चिम आणि मध्यविभागा व्यतिरिक्त परदेशातून देखील एक संघ बोलविण्यात येत. २००४-२००८ पर्यंत इंग्लंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे संघ येथे खेळत असत.
साल २००४ मध्ये, गुरुग्रामधील टेरी ओव्हल क्रिकेट मैदानावर दक्षिण विभाग आणि इंग्लंड अ यांच्यात चारदिवसीय प्रथमश्रेणी सामना झाला. सदागोपन रमेश दक्षिण विभागाचा कर्णधार होता. तोच रमेश जो १९९९ विश्वचषकात भारतासाठी सलामीला जायचा. इंग्लंड अ चा कर्णधार होता जेम्स ट्रेडवेल. इंग्लंडच्या संघात केविन पीटरसन, मॅट प्रायर, सायमन जोन्स आणि साजिद मेहमूद यांचा समावेश होता.
दक्षिण विभागाने नाणेफेक जिंकून इंग्लंड अ ला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंड अ ने केविन पीटरसनच्या शतकी खेळीच्या मदतीने पहिल्या डावात ३७७ धावा केल्या. यानंतर दक्षिण विभाग खेळण्यासाठी आला. संपूर्ण संघ जेम्स ट्रेडवेलच्या फिरकीपुढे ढेपाळला आणि १७७ धावांवर सर्वबाद झाला.
आता इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे २०३ धावांची आघाडी मिळाली. दुसर्या डावात केविन पीटरसनने पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंना त्रास दिला. दुसऱ्या डावातही त्याने शतक झळकावले आणि या शतकाच्या मदतीने इंग्लंड अ ने दक्षिण विभागासमोर ५०१ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंड अ चा विजय जवळपास निश्चितच होता.
खेळ संपण्यास दीड दिवस शिल्लक होता. पण, दीड दिवस इंग्लंडची प्राणघातक गोलंदाजी खेळणे सोपे नव्हते. तेही, जेव्हा पहिल्या डावात दक्षिण विभागाची फलंदाजी खराब झाली होती. दक्षिण विभाग हरणार हे प्रेक्षकांनी मान्य केले होते. दुसर्या डावाच्या पहिल्या दोन षटकांत फ्रान्सिस आणि महमूद यांनी भारतीय सलामीवीर माघारी धाडले.
आता दक्षिण विभाग आणि पराभव यांच्यात फारच कमी अंतर होते. श्रीधरन श्रीराम आणि वेणुगोपाल राव खेळपट्टीवर होते. हा तोच श्रीधरन श्रीराम जो आता ऑस्ट्रेलियाचा फिरकी सल्लागार आहे आणि या वर्षी आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाला मार्गदर्शन करताना दिसेल.
या दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर अशी खुंटी ठोकली की, तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कोणताही इंग्लिश गोलंदाज त्यांना बाद करू शकला नाही. ५०१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण विभाग संघाने २ गडी गमावल्यानंतर १७१ धावा केल्या.
तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतरही असे चित्र होते की, या सामन्यात इंग्लंड अ पुढे आहे. कारण चौथ्या दिवशी दक्षिण विभागाला ३३० धावांची आवश्यकता होती व त्याच्याकडे ८ विकेट बाकी होते.
पण, चौथ्या दिवशी वेणुगोपाल रावने इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजाना कसलीही संधी दिली नाही. वेणुगोपाल रावने नांगर टाकला होता. श्रीधरन श्रीरामसमवेत त्याने चौथ्या दिवशी चांगली सुरुवात केली. संघाची धावसंख्या २०० धावांच्या पुढे गेली. शेवटच्या दिवशी दोघांनीही १२ षटके फलंदाजी केली होती. दरम्यान दोघांनीही आपली शतके पूर्ण केली. परंतु, मेहमूदच्या चेंडूवर श्रीधरन श्रीराम झेलबाद झाला.
आता इंग्लंडला वाटले, सामन्यात पुन्हा पुनरागमन करू शकतो. पण, वेणुगोपाल अजुनही खेळपट्टीवर उभा होता. श्रीधरन शरतला साथीला घेत त्याने डाव सावरला. २९१ धावा झालेल्या असताना शरत वैयक्तिक २८ धावांवर बाद झाला.
वेणुगोपालने यानंतरही मागे वळून पाहिले नाही आणि शेवटी, सुब्रमण्यम बद्रीनाथबरोबर संघाला जिंकून दिले. या सामन्यात त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २२८ धावाही केल्या.वेणुगोपाल चौथ्या दिवसापर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला आणि इंग्लंड संघाचा पराभव केला होता.
त्याने तिसर्या दिवशी ४१ आणि नंतर चौथ्या दिवशी १२१ षटके त्याने फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या शेवटच्या डावात त्याने एकूण ४५७ मिनिटे फलंदाजी केली. जो द्रविडच्या ४४६ मिनिटांच्या इडन गार्डन्समधील डावापेक्षा अधिक वेळ होता. या खेळीत त्याने ३९४ चेंडूंचा सामना करत ३२ चौकार ठोकले. वेणुगोपालच्या या खेळाचे कौतुक सर्व इंग्लंडच्या खेळाडूंनी देखील केले.
जुलै २०१९ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत वेणुगोपाल राव आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेशी जोडला गेला. त्याच्या भारतीय संघातील व आंध्र प्रदेश क्रिकेटमधील योगदानाबद्दल विशाखापट्टणम येथील मैदानावरील एका प्रवेशद्वाराला त्याचे नाव देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्रर्र झाला ना घोळ! युझवेंद्र चहलला शुभेच्छा देताना राजस्थान रॉयल्सने केली ‘ही’ मोठी चूक
साहा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय