कसोटी क्रिकेट हा एक असा क्रिकेट प्रकार आहे, ज्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघांचाही कस पाहिला जातो. या प्रकारात जेथे गोलंदाज फलंदाजांची कसोटी घेतात, तर फलंदाज त्यांच्या तंत्राने गोलंदाजांची कसोटी पाहतात. म्हणून कसोटी क्रिकेट हे सर्वात कठीण स्वरूप मानले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये जिथे फलंदाज द्विशतक आणि त्रिशतके ठोकून आपले कलागुण सिद्ध करतात. तेथे गोलंदाजांनी डावामध्ये अधिकाधिक विकेट्स घेऊन आपली क्षमता सिद्ध केली.
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, तर श्रीलंकेचा फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरन कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. बर्याचदा क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल चर्चा होते. तसेच, जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजाबद्दलही होती. परंतु असे क्वचितच घडते, जेव्हा सर्वात शेवटी फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोललं जातं.
म्हणूनच या लेखात आपण त्या खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी ११व्या क्रमांकावर फलंदाजी करताना कारकीर्दीत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
१. मुथय्या मुरलीधरन
श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) केवळ कसोटीतील सर्वाधिक विकेट घेणारा नाही, तर ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकीर्दीत ११ व्या क्रमांकावर ९८ डावांमध्ये फलंदाजी केली असून, त्यात ६२३ धावा ठोकल्या आहेत.
मुरलीधरनने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत १२६१ धावा केल्या आहेत. तो केवळ कसोटीतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज नाही, तर ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
२. ग्लेन मॅकग्रा
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) कसोटी कारकीर्दीतील १२८ डावात ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने एकूण ६०३ धावा जमविल्या. ११ व्या क्रमांकावर ६०० धावा करणारा मॅकग्रा खालच्या फळीतील फलंदाजांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत मॅकग्राने ६४१ धावा केल्या आहेत. संपूर्ण कसोटी कारकीर्दीत या दिग्गज गोलंदाजाने एकूण १३८ डावात फलंदाजी केली आहे.
३. कर्टनी वॉल्श
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्शने (Courtney Walsh) त्याच्या कसोटी कारकीर्दीतील ११ व्या क्रमांकावर १२२ डावात फलंदाजी करत ५५३ धावा जमविल्या आहेत. ११ व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉल्श तिसऱ्या स्थानावर आहे. वॉल्शने आपल्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत १८५ डावांमध्ये फलंदाजी केली आणि एकूण ९३६ धावा केल्या. या गोलंदाजाने आपल्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत एकूण ५१९ बळी घेतले आहेत.
१९८७ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वॉल्शने खेळ भावनेची ओळख करून दिली, ती आजही आठवते. वॉल्शने पाकिस्तानी फलंदाज सलीम जाफरला मंकडिंगने धावबाद केले नव्हते. त्याचे उदाहरण आजही दिले जाते. जाफरने धावबाद केले असते, तर वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला असता. परंतु वॉल्शने फक्त इशारा देऊन पाकिस्तानी फलंदाज जाफरला सोडले होते.
४. ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) ११ नंबरवर खेळताना ६९ डावांमध्ये फलंदाजी केली असून एकूण ५३९ धावा केल्या आहेत. म्हणूनच या यादीत चौथ्या क्रमांकावर बोल्टचा क्रमांक लागतो. कसोटी कारकीर्दीत बोल्टने ८२ डावात फलंदाजी केली आणि ६५४ धावा केल्या.
५. जेम्स अँडरसन
या यादीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) पाचव्या क्रमांकावर आहे. ११ व्या क्रमांकावर अँडरसनने एकूण १३७ डावात फलंदाजी केली आणि ५३२ धावा केल्या आहेत. अँडरसनने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत २१२ डावांत फलंदाजीही केली आणि ११८५ धावा करण्यात तो यशस्वी झाला. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.
भारताकडून मात्र झहिर खानच्या नावावर विक्रम
याशिवाय ११ व्या क्रमांकावर भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झहीर खानच्या (Zaheer Khan) नावे आहे. ११ व्या क्रमांकावर झहीरने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण २१ डावांमध्ये फलंदाजी केली असून २१० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर संपूर्ण कसोटी कारकीर्दीत झहीरने १२७ डावांमध्ये फलंदाजी केली असून १२३१ धावा काढण्यात तो यशस्वी झाला आहे. झहीरने आपल्या कसोटी कारकीर्दीत ३ अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. कसोटीत झहीरने ३११ विकेट्सही घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-क्या बात है… शंभराव्या सामन्यात या खेळाडूंनी घातली शतकाला गवसणी
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्या खेळीतील साम्य !






