महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स व सोलापूर रॉयल्स हे संघ आमने-सामने आले. फलंदाजांनी उभारलेल्या सन्मानजनक धावसंख्येनंतर गोलंदाजांनी केलेल्या घातक गोलंदाजीचा जोरावर नाशिक संघाने तब्बल 82 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सोलापूर रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी यशस्वी ठरविला. सलामीचा फलदांज हर्षद खडीवाले(०धावा)ला विकी ओस्तवालने आपल्या गोलंदाजीवर दुसऱ्याच चेंडूवर झेल बाद केले. तर, मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अर्शिन कुलकर्णी (18 धावा) ला आज मोठी खेळी करता आली नाही. त्याला जलदगती गोलंदाज प्रणव सिंगने पायचीत बाद करून गोलंदाजीत चांगली साथ दिली.
वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे नाशिक संघ 3.5 षटकात 3 बाद 28 असा अडचणीत सापडला. त्यानंतर कौशल तांबे( 27 धावा) व सिद्धेश वीर यांनी चौथ्या गड्यासाठी 40 चेंडूत 51 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी कौशलला सोलापूरच्या फिरकीपटू सुनील यादवने यष्टीच्या मागे झेल बाद करून नाशिकला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर धनराज शिंदेने 20 चेंडूत 3 चौकार व 3 षट्काराच्या नाबाद ४२ धावांची खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. धनराजला अक्षय काळोखे(13 धावा) ने साथ दिली व या दोघांनी सातव्या गड्यासाठी 14 चेंडूत 37 धावांची भागीदारी करून संघाला 161 धावांचे आव्हान उभे करून दिले.
161 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या सोलापूर रॉयल्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. नाशिकच्या प्रशांत सोळंकी(3-12), अक्षय काळोखे(2-26) या तीन फिरकी गोलंदाजांनी सोलापूरचा डाव 16.3 षटकात सर्वबाद 79 धावात उध्वस्त केला. यामध्ये लेगस्पिनर प्रशांत सोळंकी(3-12), डावखुरा अक्षय काळोखे(2-26) व अक्षय वाईकर(1-12) यांचा मोलाचा वाटा होता. यात यश नाहर (17 धावा), यासर शेख(11 धावा), ऋषभ राठोड(32 धावा) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
डावखुरा फिरकीपटूअक्षय काळोखेने अथर्व काळे(7 धावा) आणि सुनील यादव( 0 धावा) आपल्या हफ्त्यातील शेवटच्या चौथ्या षटकातील दोन चेंडूवर दोन बळी घेतले व आपले याचबरोबर षटकही पूर्ण केले. आता त्याला सोमवारी पुणेरी बाप्पा विरुद्ध होणाऱ्या लढतीत त्याने आपल्या पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यास त्याला एक अनोखी हॅट्रिक करण्याची संधी असणार आहे.
ईगल नाशिक टायटन्स संघाला विजयाची हॅट्रिक साजरे करण्याची संधी
ईगल नाशिक टायटन्स संघाला सोमवारी सलग तिसऱ्या विजयाची संधी असली तरी त्यांच्यासमोर पुणेरी बाप्पा संघाचे कडवे आव्हान असणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघाकडून चमकदार कामगिरीच्या करणाऱ्या राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांच्यामधील झुंज पाहायला मिळणार आहे. राहुल त्रिपाठीला अजून म्हणावी तशी लय गवसलेली नाही हि त्या संघांची मूळ डोकेदुखी आहे.
ईगल नाशिक टायटन्स संघाने सोमवारी होणाऱ्या पुणेरी बाप्पा विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर त्याना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकवण्याची संधी असणार आहे.
(MPL 2023 Eagle Nashik Titans Beat Solapur Royals By 82 Runs Dhanraj Shinde And Prashant Solanki Shines)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघात होणार मोठा बदल? रोहितच्या जागी ‘हा’ पठ्ठ्या बनू शकतो कर्णधार
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’