पुणे, 17 जुन 2023: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी प्रीतम पाटील(69धावा) व तुषार श्रीवास्तव (32 धावा), किरण चोरमले (27 धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने कोल्हापुर टस्कर्स संघापुढे 177 धावांचे आव्हान उभे केले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात सलामीचा फलंदाज धीरज फटांगरेला कोल्हापूरच्या मनोज यादवने दुसऱ्याच षटकात बाद केले, तेव्हा रत्नागिरी संघ 1.3 षटकात 1 बाद 9 अशा स्थितीत होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या प्रीतम पाटीलने तडाखेबंद फटकेबाजी करत अवघ्या 32 चेंडूत 5 चौकार व 6 षट्काराच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. प्रीतमला तुषार श्रीवास्तवने 40 चेंडूत 32 धावांची संयमी खेळी करून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 62 चेंडूत 93 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणून ठेवले. पण अखेर कोल्हापूरच्या फिरकीपटू तरणजीत ढिलोनने प्रीतमला बाद केले, ज्याचा डीप मिड विकेटला सचिन धसने सुंदर झेल टिपला.
त्यानंतर कोल्हापूर संघाच्या श्रेयस चव्हाण(1-27), तरणजीत ढिलोन(1-28) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत रत्नागिरीच्या फलंदाजांना फारशी फटकेबाजी करून दिली नाही. पण अखेरच्या षटकात रत्नागिरीच्या किरण चोरमले 27 अझीम काझी नाबाद 18, निखिल नाईक नाबाद 16 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला 176 धावा उभारून दिल्या.
संक्षिप्त धावफलक: रत्नागिरी जेट्स: 20 षटकात 4 बाद 176 धावा (प्रीतम पाटील 69 (32,5×4, 6×6), तुषार श्रीवास्तव 32 (40, 2×4), किरण चोरमले 27 (27,3×4), अझीम काझी नाबाद 18, निखिल नाईक नाबाद 17, श्रेयस चव्हाण 1-27, अक्षय दरेकर 1-26 तरणजीत सिंग ढिलोन 1-28) वि.कोल्हापूर टस्कर्स.
MPL 2023 Pritam Patll Hits Fifty For Ratnagiri Jets Against Kolhapur Tuskers