---Advertisement---

MPL 2025 च्या दिमाखदार सोहळ्यासाठी एमसीए स्टेडियम सज्ज, वाचा काय असणार स्पेशल

On: मंगळवार, जून 3, 2025 2:07 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रिमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक आहे. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सज्ज असून, तयारी अंतिम टप्प्यात असलेली दिसते. बुधवारी (4 जून) होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अनेक गोष्टी नव्याने पाहायला मिळतील. या उद्घाटन सोहळ्यात काय खास असेल हे आपण माहीत करून घेऊया.

बुधवारी सायंकाळी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा उद्घाटन सोहळा पार पडेल. सायंकाळी पाच वाजल्यापासून विविध कार्यक्रमाने सोहळ्याला सुरुवात होईल. सुरुवातीला ड्रोन शो चाहत्यांना पाहायला मिळेल. अनेक ड्रोनच्या माध्यमातून विविध कलाकृती यादरम्यान दाखवल्या जाणार आहेत. त्यानंतर या कार्यक्रमात लाईव्ह म्युझिक आणि मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स होतील.

या उद्घाटन सोहळ्यातील खास आकर्षण लाईट आणि लेझर शो असेल. आयपीएल तसेच अनेक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असतो त्या प्रकारचा हा डोळे दिपवणारा लाईट शो असेल.‌ जवळपास दोन तास चालणाऱ्या या सोहळ्यात अखेरीस मान्यवरांचे मनोगत देखील होईल.‌ एमसीए अध्यक्ष रोहित पवार व प्रमुख पाहुणे खेळाडूंना शुभेच्छा देतील. यानंतर सायंकाळी सात वाजता स्पर्धेतील उद्घाटनाच्या सामन्याची नाणेफेक होईल. हंगामातील पहिला सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स व ईगल नाशिक टायटन्स यांच्या दरम्यान होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यासाठी व संपूर्ण स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनातिकीट प्रवेश दिला जाईल. मागील दोन हंगामात देखील एमसीएने अशाच प्रकारे चाहत्यांना विनामूल्य स्पर्धा पाहण्याची संधी दिली होती. तसेच, येणाऱ्या चाहत्यांकडून पार्किंगसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. याव्यतिरिक्त सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. ही स्पर्धा JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर व Star Sports 2 या चॅनलवर थेट आता येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---