---Advertisement---

MPL 2025: पुणेरी बाप्पाचा रॉयल्सला दे धक्का, नोंदवला स्पर्धेतील सर्वात मोठा विजय

On: रविवार, जून 8, 2025 1:15 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये शनिवारी तीन सामने खेळले गेले. दिवसातील तिसऱ्या सामन्यात पुणेरी बाप्पा व रायगड रॉयल्स हे संघ समोरासमोर होते. गुणतालिकेतील पहिल्या दोन स्थानांसाठी झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पाने तब्बल 99 धावांनी विजय मिळवत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. शानदार अर्धशतक झळकावणारा ‌यश नहार सामन्याचा मानकरी ठरला.

आपले पहिले-पहिले सामने जिंकलेल्या पुणेरी बाप्पा व रायगड रॉयल्स यांच्यातील सामन्यात पुणे संघाला पहिली फलंदाजाची संधी मिळाली. यश नाहर व मुर्तझा ट्रंकवाला हे सलामीवीर सलामी देण्यासाठी उतरले. मात्र, ट्रंकवाला केवळ चार धावा काढून बाद झाला. त्यानंतर यश व ऋषिकेश सोनवणे यांनी रायगडच्या गोलंदाजांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले.

दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 128 धावांची मोठी भागीदारी रचली. ऋषिकेश 40 चेंडूंमध्ये 58 धावा करत बाद झाला. मात्र, दुसऱ्या बाजूने यश याने आपले आक्रमण सुरू ठेवले. त्याने 52 चेंडूमध्ये 82 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये यष्टीरक्षक सुरज शिंदे याने रायगडच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. त्याने पाच षटकार व एका षटकाराच्या मदतीने 12 चेंडू नाबाद 40 धावा कुटल्या. त्याच्या योगदानामुळे पुणे संघाने 202 अशी हंगामातील सर्वात मोठी मजल मारली.

भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या रायगड रॉयल्सला पहिल्या षटकातच पहिला धक्का बसला. या धक्क्यातून रायगड संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही. तेव्हा 13.1 षटकांमध्ये त्यांचा संघ 103 धावांमध्ये सर्वबाद झाला‌. रायगडचा कर्णधार ऋषभ राठोड याने 21 चेंडूत 46 धावा करत एकतर्फी झुंज दिली. पुणेरी बाप्पासाठी वेगवान गोलंदाज निकित धुमाळ याने 39 धावांमध्ये पाच फलंदाज बाद करत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---