---Advertisement---

MPL 2025: अखेर ईगल नाशिक टायटन्स पराभूत, रायगड रॉयल्सचा दुसरा विजय

On: शुक्रवार, जून 13, 2025 7:02 AM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये गुरुवारी (12 जून) एकमेव सामना खेळला गेला. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ईगल नाशिक टायटन्स व पाचव्या क्रमांकावरील रायगड रॉयल्स यांच्यातील या सामन्यात रायगडने उलटफेर करत विजय नोंदवला. नाशिक संघाचा हा हंगामातील पहिलाच पराभव ठरला. रायगडसाठी ‌नाबाद शतक ठोकणाऱ्या सिद्धेश वीर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

गहुंजे येथे झालेल्या या सामन्यात रायगड संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ऋग्वेद मोरे याच्या रूपाने पहिला धक्का लवकर बसल्यानंतर अनुभवी सिद्धेश वीर याने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. आधी युवा हर्ष मोगावीरा याच्यासोबत त्याने अर्धशतकी भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. त्यानंतर ओमकार खाटपे याच्यासोबत 42 चेंडूंमध्ये 73 धावांची निर्णायक भागीदारी केली. ओमकार याने 30 धावांचे योगदान दिले. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये अजय बोरुडे याने आक्रमक खेळ करत 10 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला सिद्धेश 62 चेंडूंमध्ये 104 धावांची खेळी करून नाबाद राहिला. या दोघांच्या खेळामुळे रायगडने हंगामातील सर्वोच्च 216 धावा उभ्या केल्या. नाशिक संघासाठी प्रशांत सोलंकी व मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना नाशिक संघाला चांगली सलामी अपेक्षित होती. मंदार भंडारी लवकर बाद झाल्यानंतरही युवा अर्शिन कुलकर्णी व साहिल पारख यांनी कोणतेही दडपण न घेता पाच षटकात अर्धशतक फलकावर लावले. अर्शिन 24 चेंडूंमध्ये 38 धावा करून बाद झाला. तर, साहिल याने अधिक आक्रमक खेळ दाखवत 20 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर रोहन दामले व अथर्व काळे यांनी धावांचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चौदाव्या षटकात पावसाचे आगमन झाले. पावसाने जोर धरल्याने पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार रायगडला 5 धावांनी विजयी घोषित केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---