---Advertisement---

MPL 2025: पुणेरी बाप्पा पहिल्या विजयासाठी उत्सुक, रत्नागिरी जेट्स दोन गुणांच्या शोधात

On: शुक्रवार, जून 6, 2025 9:01 AM
Ratnagiri Jets
---Advertisement---

महाराष्ट्र प्रिमियर लीगचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरु झाला आहे. हंगामातील तिसरा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा असा रंगेल. पहिल्या सामन्यात पराभूत झालेला रत्नागिरी जेट्स गुणतालिकेत खाते खोलण्याचा प्रयत्न करेल. तर, पुणेरी बाप्पा विजयाने श्रीगणेशा करण्यासाठी मैदानात उतरेल.

रत्नागिरी जेट्स संघाने हंगामातील उद्घाटनाचा सामना खेळला होता. मात्र, धावफलकावर 194 धावा उभ्या करूनही त्यांना आठ गड्यांनी मोठा पराभव पत्करावा लागला. मंदार भंडारीने ठोकलेल्या शतकाने ईगल नाशिक टायटन्सला विजयी सुरुवात करून दिली. दुसऱ्या बाजूला पुणेरी बाप्पा संपूर्ण तयारीनिशी आपल्या पहिल्या सामन्यात उतरतील. पहिल्या दोन हंगामात त्यांना प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करता आला होता. मात्र, अंतिम फेरी त्यांच्यासाठी दूरच राहिलेली. त्यामुळे या हंगामात थेट विजेतेपद पटकावण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.

रत्नागिरी जेट्स संघाच्या फलंदाजीची मदार पुन्हा एकदा धीरज फटांगरे व कर्णधार अझीम काझी यांच्यावर असेल. दोघांनी पहिल्या सामन्यात अनुक्रमे 80 व 42 धावा केल्या होत्या. तर, निखिल नाईक व प्रीतम पाटील यांना देखील आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावा लागेल. गोलंदाजीत संघाची धुरा दिव्यांग हिंगणेकर, प्रदीप दाढे व विजय पावले हेच वाहताना दिसतील. तर, फिरकीपटू सत्यजित बच्छाव व कुणाल थोरात यांना देखील अपेक्षित कामगिरी करावी लागेल.

पुणेरी बाप्पा हंगामाची सुरुवात करताना नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या विना मैदानात उतरणार आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व यश क्षीरसागर हा करताना दिसेल. त्याच्या जोडीला अनुभवी मूर्तझा ट्रंकवाला, नौशाद शेख आणि सुरज शिंदे असतील. गोलंदाजीत पुणेरी बाप्पाकडे अनेक पर्याय दिसून येतात. वेगवान गोलंदाजीत सचिन भोसले, पियुष साळवे, निकित धुमाळ यांच्या जोडीला अष्टपैलू रामकृष्ण घोष असेल. तर, फिरकी गोलंदाज म्हणून चायनामन रोशन वाघसरे व रोहन खरात जबाबदारी सांभाळतील.

एमपीएल 2025 मधील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होतील. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात 190 पेक्षा जास्त धावसंख्या उभी राहिली आहे. तिसऱ्या सामन्यात देखील खेळपट्टी अशीच राहू शकते. त्यामुळे सामना मोठ्या धावसंख्येचा होऊ शकतो. हा सामना JioHotstar व Star Sports 2 येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजल्यापासून पाहता येईल.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

रत्नागिरी जेट्स- धीरज फटांगरे, प्रीतम पाटील, अझीम काझी, किरण चोरमले, निखिल नाईक, दिव्यांग हिंगणेकर, साहिल चुरी, अभिषेक पवार, सत्यजित बच्छाव, कुणाल थोरात, प्रदीप दाढे
इम्पॅक्ट प्लेअर- विजय पावले

पुणेरी बाप्पा- यश क्षीरसागर, मुर्तझा ट्रंकवाला, नौशाद शेख, साहिल औताडे, सुरज शिंदे, रामकृष्ण घोष, रोशन वाघसरे, रोहन खरात, सचिन भोसले, पियुष साळवी, निकीत धुमाळ
इम्पॅक्ट प्लेअर- यश नहार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---