महाराष्ट्र प्रिमियर लीगचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरु झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेतील दुसरा सामना रायगड रॉयल्स विरुद्ध सातारा वॉरियर्स यांच्या दरम्यान गुरुवारी (5 जून) खेळला जाईल. हंगामातील आपला पहिला सामना जिंकून विजयी प्रारंभ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.
पहिल्या हंगामात सोलापूर रॉयल्स नावाने खेळणाऱ्या संघाने दुसऱ्या हंगामात आपले बस्तान रायगडला हलवत रायगड रॉयल्स असे नाव धारण केले. मात्र, असे असताना देखील त्यांना दोन्ही हंगामात चांगली कामगिरी करता आली नाही. ते या दोन्ही हंगामात प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी किंग्स संघ एमपीएलमधून बाहेर पडल्याने सातारा वॉरियर्स प्रथमच या स्पर्धेत दिसतील. गुरुवारी ते आपला पहिलाच सामना खेळणार आहेत.
रायगड रॉयल्स संघात बरेचसे खेळाडू पहिल्या दोन हंगामात खेळलेले आहेत. त्यामध्ये कर्णधार ऋषभ राठोड, तनय संघवी, सिद्धेश वीर व विकी ओस्तवाल यांचा समावेश आहे. हितेश वाळुंज व दिग्विजय यावेळी प्रथमच रायगड संघाचा भाग असतील. दुसरीकडे, सातारा संघाची मदार त्यांचा कर्णधार सौरभ नवले व उपकर्णधार पवन शहा यांच्यावर असेल. फलंदाजीत मेहुल पटेल, ओम भोसले, शमशुझमा काझी व हर्षल काटे हे संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी प्रयत्न करतील. सातारा संघाची सर्वात मोठी ताकद राजवर्धन हंगरगेकर, सनी पंडित व विवेक शेलार हे गोलंदाज ठरू शकतात..
एमपीएल 2025 मधील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होतील. हंगामाची सुरुवात असल्याने खेळपट्टी नवीन असेल. त्यामुळे पहिल्या सामन्या प्रमाणे यावेळी देखील 190 पेक्षा जास्तच्या उभ्या केल्या जाऊ शकतात. ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक असेल. हा सामना JioHotstar व Star Sports 2 येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून पाहता येईल.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
रायगड रॉयल्स- सिद्धेश वीर, हर्ष मोगावीरा, दिग्विजय पाटील, स्वप्निल फुलपगार, वैभव आगम, ऋषभ राठोड, विकी ओस्तवाल, हितेश वाळुंज, निखिल कदम, तनय संघवी व हर्ष ओसवाल.
सातारा वॉरियर्स- पवन शहा, ओम भोसले, शमशुझमा काझी, मेहुल पटेल, सौरभ नवले, हर्षल काटे, वैभव चौगुले, राजवर्धन हंगरगेकर, शुभम मैद, विवेक शेलार व सनी पंडित.





