कसोटी आणि वनडे या क्रिकेट प्रकारात 50 हून अधिकच्या सरासरीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा माजी दिग्गज एबी डिविलियर्स याची गणना होते. डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मैदानातील सर्व बाजूंना फटकेबाजी करण्यामुळे त्याला ‘मिस्टर 360’ या नावाने क्रिकेटजगत ओळखते. मागील काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे डिविलियर्स भलताच चर्चेत आहे. अशात त्याने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. डिविलियर्सने 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याविषयीच त्याने हा खुलासा केला आहे.
डिविलियर्सचा धक्कादायक खुलासा
आपल्या विस्फोटक फलंदाजीने विरोधी संघाच्या गोलंदाजांना धडकी भरवणारा दिग्गज एबी डिविलियर्स (AB De Villiers) याची निवृत्ती कोट्यवधी चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. आता निवृत्तीच्या पाच वर्षांनंतर त्याने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला आहे की, त्यावेळी संघातील वातावरण सर्वात मोठी समस्या होती.
एका मुलाखतीत डिविलियर्स याने त्याच्या निवृत्तीविषयी संबंधित प्रश्नावर म्हटले की, त्यावेळी “संघातील वातावरण माझ्यासाठी सर्वात मोठी समस्या होती. बाऊचर, स्मिथ आणि जॅ कॅलिस यांसारख्या सहकारी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर अचानक तिथे माझ्यासाठी कुणीच राहिले नव्हते. माझ्याकडे तो सेटअप नव्हता, ज्याची सर्वात जास्त गरज होती.”
पुढे बोलताना डिविलियर्स असे म्हणाला की, “माझ्यावर गोष्टी चालवण्याची खूप जबाबदारी होती. जे मला खूप चांगलेही वाटत होते. मात्र, तुम्हाला यासाठी चार ते पाच लोकांचा गट हवा असतो, जे या गोष्टी समजेल. त्यावेळी संघात असे वातावरण दिसत नव्हते. संघाचे काही सदस्य खूपच खासगी होते, आणि काही नव्हतेही. मात्र, मला वाटले की, हीच निवृत्तीची सर्वात चांगली वेळ आहे.”
डिविलियर्सची कारकीर्द
दक्षिण आफ्रिका संघाकडून डिविलियर्स याने 114 कसोटी, 228 वनडे आणि 78 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 20 हजारांहून अधिक धावांची नोंद आहे. कसोटीत डिविलियर्सने 22 शतके आणि 50.66च्या सरासरीने 8765 धावा केल्या आहेत. तसेच, कसोटीत त्याने 2 द्विशतकेही झळकावली आहेत. वनडेत त्याने 25 शतके आणि 53.5च्या सरासरीने 9577 धावा चोपल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याने 26.12च्या सरासरीने 1672 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे, वनडेत त्याच्या नावावर सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रमही आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त 31 चेंडूत शतक झळकावले होते. याव्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये एकूण 184 सामने खेळताना 39.71च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचाही समावेश आहे. (mr 360 ab de villiers reveals the reason of his retirement in 2018)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा फ्रॉड! आपल्याच खेळाडूंचे 25-25 लाख लाटले, वाचा सविस्तर
वेस्ट इंडीज क्रिकेटला लागली घरघर! 7 वर्षात आयसीसी ट्रॉफीची मुख्य फेरी गाठणेही झाले दुरापस्त






