आयपीएल २०२० च्या हंगामात रविवारी(२७ सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघात रोमांचक सामना पहायला मिळाला. शारजाहमध्ये पार पडलेल्या या सामन्यात पंबाजने दिलेल्या २२४ धावांचे आव्हान राजस्थानने १९.३ षटकात यशस्वी पूर्ण करत सर्वांना आश्चर्यकित केले. राजस्थानने मिळवलेल्या या विजयात राहुल तेवतियाचा महत्त्वाचा वाटा होता.
त्याने ३१ चेंडूत ७ षटकारांसह ५३ धावा केल्या. यातील ३० धावा त्याने शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर १८ व्या षटकात तब्बल ५ षटकार मारत काढल्या. या षटकातील पहिल्या चार चेंडुवर राहुलने सलग ४ षटकार मारले होते. त्याचे हे ४ षटकार पाहून अनेकांना युवराज सिंगच्या २००७ टी२० विश्वचषकातील सलग ६ षटकारांची आठवण झाली होती.
राहुल देखील असेच एका षटकात सलग ६ षटकार मारतो की काय असेच वाटत होते. परंतु पाचवा चेंडू राहुलने निर्धाव खेळला आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा एक षटकार खेचला. त्यामुळे एका षटकात सलग ६ षटकारांचा विक्रम होता होता राहिला. मात्र राहुलने या षटकात काढलेल्या ३० धावांमुळे राजस्थानला सामना जिंकण्यात मोठी मदत झाली.
या सामन्यानंतर युवराजने ट्विट करत सलग ६ षटकार न मारल्याबद्दल गमतीने राहुलला धन्यवाद म्हटले आहे. युवराजने ट्विट केले की, ‘मिस्टर राहुल तेवतिया, ना भाई ना! एक चेंडू निर्धाव खेळण्याबद्दल धन्यवाद. काय मस्त सामना झाला. राजस्थानचे त्यांच्या शानदार विजयाबद्दल अभिनंदन. मयंक अगरवाल, संजू सॅमसन तूम्हीही चांगली कामगिरी केली.’
Mr @rahultewatia02 na bhai na 😅 thanks for missing one ball ! What a game congratulations to rr for a spectacular win !!! #RRvKXIP @mayankcricket great knock @IamSanjuSamson brilliant !
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) September 27, 2020
युवराजने २००७ च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध खेळताना स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत सलग ६ षटकार मारले होते. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. तसेच त्याने तेव्हा १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. हे आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात जलद अर्धशतक आहे. आजही हा विक्रम युवराजच्याच नावावर आहे.
रविवारी पंजाब आणि राजस्थान संघात झालेल्या सामन्यात २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून राहुल व्यतिरिक्त सॅमसनने सर्वाधिक ८५ धावा केल्या. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने ५० धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मयंक अगरवाल(१०६) आणि केएल राहुलच्या(६९) खेळींच्या जोरावर २० षटकात २ बाद २२३ धावा केल्या होत्या आणि राजस्थानला २२४ धावांचे आव्हान दिले होते.