पुणे। नाशिकमध्ये पार पडलेल्या रोमांचकारी पहिल्या फेरीनंतर एमआरएफ मोग्रिप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेच्या दुसर्या फेरीचे आयोजन करण्याची संधी पुणेकरांना येत्या शनिवारी मिळणार आहे. मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयासमोरील मैदानात रंगणार्या या स्पर्धेत 110 अव्वल बायकर्स भाग घेणार असून त्यांच्यासाठी 700 मीटर अंतराचा आव्हानात्मक ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
कोविडच्या काळात अपघातामुळे दुखापतीचा सामना करावा लागलेला पुण्याचा माजी राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेता ऋग्वेद बारगुजे या स्पर्धेत सहभागी होणार असून तो टीव्हीएस पेट्रन्स टीम या नव्या संघाचे प्रतिनिधित्व करतो आहे. पहिल्या फेरीतील पहिल्या मोटोमध्ये तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्यानंतर टीव्हीएस आरटीआर-300 मोटारसायकलवर स्वार होताना त्याने दुसर्या मोटोमध्ये पहिला क्रमांक पटकावून आपला दर्जा दाखवून दिला. तो आता 500 सीसी गाड्यांच्या गटात 33 गुणांसह सर्वसाधारण दुसर्या स्थानावर आहे. टीव्हीएस आरटीआर-300 मोटारसायकल वापरणारा त्याचाच संघसहकारी सी. डी. जिनान 37 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.
पुण्यातील फेरीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर 20 डबल जम्प, दोन टेबल टॉप आणि 10 व्हूप डी डूज यांचा समावेश असल्यामुळे हा ट्रॅक आव्हानात्मक बनला आहे. वरिष्ठ गटात ऋग्वेद बारगुजे आघाडीवर असताना 15 वर्षांखालील ज्युनियर गटात 500 सीसी गाड्यांच्या विभागात युवराज कोंडेदेशमुख अव्वल स्थान राखून आहे.
कोल्हापूरमध्ये बारगुजेने नाशिकच्या कावासाकी केएक्स 250 मोटारसायकल वापरणार्या यश पवारला पराभूत केले होते. तर टीव्हीएस आरटीआर-300 मोटारसायकल वापरणार्या मुंबईच्या बादल जोशीला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
पुण्याची स्पर्धा एकूण 17 विविध गटांमध्ये होणार असून त्यातील पाच गट राष्ट्रीय स्तरावरील आहेत. त्यामध्ये 1) फॉरिन ओपन, 2) नॉव्हिस ओपन (250 सीसी फोर स्ट्रोक), 3) ज्युनियर्स ग्रुप बी ओपन, 4) एक्स्पर्ट्स ओपन आणि 5) ग्रुप सी ओपन (250 सीसी पर्यंत फोर स्ट्रोक) या गटांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे एफएमएक्स फ्रीस्टाईल रायडिंग हे या स्पर्धेचे खास आकर्षण ठरेल. यामध्ये काही परदेशी बायकर्स चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवितील. त्यामध्ये ज्यो डफिल्ड (कावासाकी 450) व शॉन वेब (वायझेड250) हे रायडर्स फ्रीस्टाईल कौशल्ये प्रदर्शित करतील. हे दोन्ही ऑस्ट्रेलियन रायडर्स पुण्यात पहिल्यांदाच येत असून त्यांचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्य व्हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरास शानदार प्रारंभ
४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताचा सर्वात मोठा संघ जाहीर
थायलंडमध्ये दुसऱ्या क्रमांकासह संजयचे यशस्वी पुनरागमन