चेन्नई सुपर किंग्सने गुरुवारी (२४ मार्च) सर्वांनाच धक्का देणारी बातमी दिली. एमएस धोनी याने चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून आता रविंद्र जडेजा नवा कर्णधार असणार आहे. त्यामुळे आता २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२२ च्या हंगामात धोनी जडेजाच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसेल. असे असले तरी, दोन्ही खेळाडूंची आकडेवारी पाहाता मोठी तफावत जाणवते.
धोनीची आयपीएलमधील शानदार कामगिरी
धोनीने (MS Dhoni) आत्तापर्यंत आयपीएल २२० सामने खेळले आहेत. यात त्याने ३९.५५ च्या सरासरीने ४७४६ धावा केल्या असून २३ अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने यष्टीरक्षण करताना १६१ विकेट्स घेतल्या आहेत. धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिकवेळ कर्णधार म्हणून घालवला आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या १४ आयपीएल हंगामातील १३ हंगामात नेतृत्त्व केले आहे. तसेच त्याच्याच नेतृत्त्वाखाली चेन्नईने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे. तसेच तब्बल ९ वेळा चेन्नई संघ त्याच्या नेतृत्त्वाखाली अंतिम सामना खेळला आहे.
धोनीने आयपीएल कारकिर्दीत खेळलेल्या २२० सामन्यांपैकी २०४ सामन्यांत नेतृत्त्व केले आहे. यातील १२१ सामन्यात विजय मिळवला आहे. त्याने ११६ सामने चेन्नईचे नेतृत्व करताना जिंकले आहेत, तर ५ सामने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व करताना जिंकले आहेत. धोनी आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांत विजय मिळवणारा पहिला कर्णधार आहे. इतकेच नाही, तर तो २०० पेक्षा अधिक आयपीएल सामन्यांत नेतृत्त्व करणारा देखील एकमेव कर्णधार आहे.
इतकेच नाही, तर धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दोन वेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धाही जिंकली आहे.
जडेजाने तब्बल १५ वर्षे पाहिली वाट
रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्त्वाचा अनुभव पाहिला, तर त्याने १५ वर्षांपूर्वी नेतृत्त्व केले होते. त्याने २८ ऑक्टोबर २००७ रोजी १९ वर्षांखालील विनू मंकड स्पर्धेत राजकोटमधील वेस्टर्न रेल्वे ग्राऊंडवर १९ वर्षांखालील सौराष्ट्र संघाचे नेतृत्त्व केले होते. तो १९ वर्षांखालील मुंबई संघाविरुद्ध सामना झाला होता. त्यानंतर त्याने एकदाही कोणत्याच स्तरावर कुठल्याही संघाचे नेतृत्त्व केलेले नाही.
त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २०० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २३८६ धावा केल्या असून त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने १२७ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच त्याच्या एकूण टी२० कारकिर्दीचा विचार करायचा झाल्यास त्याने २७६ सामने खेळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे इतके सामने खेळूनही त्याने एकाही सामन्यात नेतृत्त्व केले नव्हते. पण आता त्याला तब्बल २७६ टी सामन्यांनंतर नेतृत्त्व करण्याची संधी मिळणार आहे.
जडेजाच्या आयपीएल अनुभवापेक्षा धोनीने अधिकवेळ केलंय नेतृत्त्व
विशेष गोष्ट अशी की, जडेजा आत्ता जरी चेन्नईचे नेतृत्त्व करणार असला तरी, त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीपेक्षाही धोनीचा नेतृत्त्वाचा अनुभव मोठा आहे. आकडेवारीत सांगायचे झाले, तर जडेजाने आत्तापर्यंत २०० आयपीएल सामने खेळले आहेत, तर धोनीने २०४ आयपीएल सामन्यांमध्ये नेतृत्त्व केले आहे. असे असले तरी, जडेजाला चेन्नईचे नेतृत्त्व करताना धोनीचे मार्गदर्शन मिळणार आहे. कारण धोनीने चेन्नईचे नेतृत्त्व सोडले असले, तरी तो खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
थलायवन इरुकिंद्रन! सीएसकेच्या नव्या कर्णधाराची आली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला जडेजा