पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात बुधवारी (४ मे) खेळवला जाणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे पार पडणार असून हा सामना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी याच्यासाठी खास असणार आहे.
धोनी (MS Dhoni) जेव्हा या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मैदानात आला, तेव्हा त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला. हा त्याचा चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीतील २०० वा आयपीएल सामना (200 IPL Matches) असणार आहे. त्यामुळे एकाच आयपीएल संघाकडून २०० किंवा त्यापेक्षा अधिक आयपीएल सामने खेळणारा तो विराट कोहलीनंतरचा (Virat Kohli) दुसराच खेळाडू ठरेल. विराट देखील बुधवारच्या सामन्यात खेळणार असल्याने त्याच्यासाठी हा बेंगलोरच्या जर्सीतील २१८ वा सामना असेल.
विराट आणि धोनी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही खेळाडूने आयपीएलमध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने एकाच संघाकडून खेळलेले नाही.
धोनीचा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा एकूण २३० वा सामना आहे. पण त्याने ३० सामने २०१६ आणि २०१७ आयपीएल हंगामात मिळून रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळले आहेत. त्याने २३० सामन्यांत जवळपास ३९ च्या सरासरीने ४८०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
धोनी पुन्हा झालाय कर्णधार
खरंतर आयपीएल २०२२ हंगामापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सोडले होते. ही जबाबदारी त्याच्यानंतर चेन्नईने रविंद्र जडेजाच्या खांद्यावर टाकली होती आणि धोनी या आयपीएल हंगामात केवळ यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत होता. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी चांगली झाली नाही. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्यामुळे जडेजाने ८ सामन्यांनंतर वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा धोनीकडे सोपवण्यात आले.
धोनीसाठी बुधवारचा सामना कर्णधार म्हणून ३०२ वा टी२० सामना असणार आहे. तो ३०० हून अधिक टी२० सामन्यात नेतृत्व करणारा धोनी पहिला आणि सध्यातरी एकमेव खेळाडू आहे.
महत्त्वाचा बातम्या –
टीम इंडिया बनली टी२० क्रिकेटची बॉस, वार्षिक क्रमवारीत अव्वलस्थानी; वनडे, कसोटीतील स्थान पाहा
‘प्रोफेसर अश्विनच्या डाव्या हाताचा खेळ,’ क्रिकेटच नाही चेसमध्येही फिरकीपटू माहिर, पाहा व्हिडिओ
एप्रिल महिन्यासाठी आयसीसीचे ‘प्लेयर ऑफ द मंथ’ नामांकन ‘या’ तिघांना, भारतीय वंशाचा क्रिकेटरही सामील