एम एस धोनीला भारतीय क्रिकेटचा ‘भीष्म पितामह’ मानलं जातं. फक्त चाहत्यांमध्येच नाही, तर सहकारी खेळाडूंच्याही मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे. भारताला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या या माजी कर्णधाराने आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडवले, त्यांना संधी दिली आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करून दिलं.
अशाच खेळाडूंमध्ये दीपक चाहर याचं नाव महत्त्वाचं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चाहरने नवीन चेंडूने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकलं. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला 2018 मध्ये भारतीय संघात स्थान मिळालं.
दरम्यान, काल 21 एप्रिलच्या रात्री आयपीएल 2026च्या सराव सत्रादरम्यान एक खास प्रसंग पाहायला मिळाला. सध्या वेगवेगळ्या संघांत खेळत असल्यामुळे चाहर आणि धोनी यांची भेट क्वचितच होते. मात्र वानखेडे मैदानावर सराव करताना धोनी दिसताच चाहरने त्याच्या पायाला स्पर्श करून आदर व्यक्त केला.
या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या वेळी धोनी हलक्या फुलक्या शैलीत म्हणाले, “अरे, तू कॅमेरा घेऊन भेटायला आला आहेस, मग बोलणं कसं होणार?” या क्षणाने चाहत्यांची मनं जिंकली असून, गुरु-शिष्याच्या नात्याचं सुंदर उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं.
आयपीएल 2026 मध्ये एमएस धोनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही. हंगामाच्या सुरुवातीलाच ते दुखापतीमुळे पहिल्या 4-5 सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही अशी माहिती समोर आली होती. आता आगामी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






