भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढच्या महिन्यात आपल्या क्रिकेटपटूंसाठी ६ आठवड्यांच्या शिबिराचे आयोजन करणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यात दिसणार की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. धोनीला केंद्रीय करार यादीतून काढून टाकण्यात आल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु जेव्हा शिबिराचे आयोजन होईल, तेव्हा त्यात कराराच्या बाहेरचेही काही खेळाडू असतील.
निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) म्हणाले, “जर टी२० विश्वचषक होणार असेल, तर धोनीला (MS Dhoni) बोलावलं जाऊ शकते.”
परंतु त्यांचं म्हणणं आहे, की द्विपक्षीय मालिकेबद्दल निवड समिती वेगळ्या पद्धतीने विचार करू शकते. ते पुढे म्हणाले, “मला माहीत नाही टी२० विश्वचषक होणार आहे की नाही? जर होणार असेल आणि तुम्ही शिबिराला विश्वचषकाची तयारी म्हणून बघत असाल, तर अशावेळी धोनीला निश्चितच संघात असायला हवं. आपल्या जवळ अगोदरच केएल राहुल, रिषभ पंत आणि संजू सॅमसन आहेत.”
धोनीच्या शिबिरातील उपस्थितीमुळे या यष्टीरक्षकांना खूप मदत होईल, असेही ते पुढे म्हणाले.
धोनीच्या २०११ विश्वचषक विजेत्या संघाचा माजी सहकारी आशिष नेहरा (Ashish Nehra) याला वाटते, की धोनीला स्वत: हून खेळायचे असेल तर त्याने संघात असावे. तो म्हणाला, “जर मी राष्ट्रीय निवडकर्ता असतो, तर धोनी माझ्या संघात असता. पण त्याला खेळायचे आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. शेवटी धोनीला काय पाहिजे. हे पाहणं महत्त्वाचे आहे.”
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) हा या शिबिरात युवा खेळाडूंना पाहू इच्छित आहे. तो म्हणाला, “त्यामध्ये सूर्यकुमार यादवसह १९ वर्षांखालील संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोई आणि यशस्वी जयस्वाल असायला हवेत. त्यांना वरिष्ठ खेळाडूंबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली पाहिजे. टी२० साठी सूर्यकुमारसारखा मोठा दावेदार कोणीच नाही.”
धोनीबरोबर निवड समितीने याविषयी चर्चा केली पाहिजे, असे भारताचे माजी यष्टिरक्षक आणि समालोचक दीप दासगुप्ता यांना वाटत आहे. ते म्हणाले, “हे शिबीर आठवडाभर चालेल आणि धोनी त्याचाच एक भाग असेल, तर दुसऱ्या यष्टीरक्षकांना त्याच्याकडून शिकण्याची संधी मिळेल. तो शिबिराचा भाग नसला तरी मी त्याची दावेदारी फेटाळून लावणार नाही. जर त्याने आयपीएलमध्ये चौथ्या स्थानी फलंदाजी करताना ५०० धावा केल्या, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”
धोनीला शिबिरासाठी निवडल्यास हे फार आश्चर्यकारक ठरेल, असे निवड समितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, “तो एक वर्ष खेळला नाही. आपल्याला त्याच्या तंदुरुस्तीबद्दल माहिती नाही. तो केंद्रीय करारामध्ये (Central Contract) नाही आणि गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० साठीही त्याची निवड केली नव्हती. जर त्यानंतरही त्याला शिबिरासाठी बोलावले गेले, तर ते निश्चितच आश्चर्यकारक असेल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-श्रीसंतच्या स्वागतासाठी संघ झाला सज्ज; सचिन म्हणतोय मी ७ वर्षांपासून…
-क्रिकेटलाही कोरोनाची झळ! या माजी कर्णधारालाही झाली कोरोनाची लागण
-इंग्लंडला जाण्यापूर्वी शोएब मलिक ‘या’ कारणासाठी भारतात येणार