इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना रविवारी (१९ सप्टेंबर) प्रारंभ होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिलीच लढत ५ वेळेस आयपीएल स्पर्धेचे विजेते मुंबई इंडियन्स आणि ३ वेळेस आयपीएल स्पर्धेचे विजेते चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये पार पडणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याने गेली अनेक वर्ष भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत देखील एक फिनिशर म्हणून त्याने आपली वेगळीच छाप सोडली आहे. फिनिशर म्हणून त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
शेवटच्या षटकांमध्ये धोनीचा जलवा
आयपीएल स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत असतो. अगदी पहिल्या चेंडूपासूनच फलंदाज गोलंदाजांवर हल्लाबोल करायला सुरुवात करत असतात. तसेच शेवटच्या षटकांमध्येही फलंदाज चौफेर फटकेबाजी करून गोड शेवट करण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु मोजकेच असे काही फलंदाज आहेत, जे शेवटच्या षटकांमध्ये फिनिशरची भूमिका पार पाडून गोलंदाजांना अडचणीत टाकू शकतात. आयपीएल स्पर्धेच्या गेल्या १३ हंगामात एमएस धोनीने असा कारनामा केला आहे. त्याला ५ हंगामात शेवटच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्यात यश आले होते.
धोनीने आयपीएलच्या सर्वात पहिल्या हंगामात म्हणजे २००८ मध्ये शेवटच्या षटकांमध्ये एकूण १६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०११ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने अंतिम षटकांमध्ये २१२ धावा केल्या होत्या. तर २०१४ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या षटकांमध्ये त्याने २५३ आणि २०१८ मध्ये स्पर्धेत त्याने २५२ धावा केल्या होत्या.
तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीने शेवटच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम एकदाच केला आहे. त्याने २०१६ मध्ये शेवटच्या षटकांमध्ये २०५ धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज कायरोन पोलार्डने हा कारनामा ३ हंगामात केला आहे. त्याने २०१०, २०१५ आणि २०२० मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात शेवटच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता. तसेच आंद्रे रसेलला फक्त १ वेळा एका हंगामात शेवटच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी करता आली आहे. रसलने २०१९ मध्ये झालेल्या हंगामात ३०५ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
वयाच्या छत्तीशीत कार्तिकचा धोनीची शैली अवगत करण्याचा प्रयत्न, कडक ‘हेलिकॉप्टर शॉट’चा व्हिडिओ सुपरहिट
‘सिक्सर किंग’ रोहितकडे इतिहास रचण्याची संधी, षटकारांचा ‘हा’ विक्रम करणारा बनेल पहिलाच भारतीय
‘थाला’च्या आयपीएल अध्यायाचा यंदा होणार शेवट? सीएसके कर्णधाराच्या कारकिर्दीविषयी भविष्यवाणी