भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी हा महिना खूप चांगला असल्याचे सिद्ध होत आहे. यापूर्वी त्यांची टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सची (एनसीसी) पुनर्रचना करण्यासाठी तयार केलेल्या समितीमध्ये सल्लागार म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. एनसीसीला अधिक समर्पक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, ज्यात धोनीलाही स्थान मिळाले.
हे आहेत इतर सदस्य
या नव्या समितीचे अध्यक्ष माजी खासदार विजयंता पांडा हे असतील. याव्यतिरिक्त ज्येष्ठ खासदार विनय सहस्त्रबुद्धे व प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचादेखील या समितीमध्ये समावेश केला गेला आहे. एकता आणि शिस्त हा एनसीसीचा सर्वात मोठा भाग आहे. एनसीसीमध्ये कॅडेट्सना संघटितपणे काम आणि शिस्तीने काम करणे शिकवले जाते. या व्यतिरिक्त, देशभक्तीची भावना, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी गोष्टी एनसीसीमध्ये मुले शिकतात. देशसेवेमध्ये कारकीर्द करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या एनसीसी प्रमाणपत्राचा फायदा होत असतो.
धोनीचा सैन्यदलाशी जवळचा संबंध
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या एमएस धोनीचा भारतीय सैन्य दलाचे अत्यंत नजीकचा संबंध आहे. त्याला भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही रॅंक उपलब्ध असून, धोनी अनेकदा भारतीय सैन्यासोबत सीमारेषेवर जाऊन आपली सेवा देत असतो. धोनी आपल्याला मिळालेला पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारण्यासाठी देखील सैन्याच्या पोषाखात पोहोचला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्वीकारली आहे निवृत्ती
भारताला सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार अशी ओळख असलेल्या धोनीने मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सध्या तो केवळ आयपीएलमध्ये सहभागी होत असतो. पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून मार्गदर्शक म्हणून आपली नवी कारकीर्द सुरू करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहली देणार टी२० कर्णधारपदाचा राजीनामा, भावनिक पोस्टसह केली घोषणा
टी२० विश्वचषकाआधी विराटसमोर चार मोठे यक्षप्रश्न, शोधावी लागतील उत्तरे
आयपीएल २०२१: चेन्नई संघात दुखापतग्रस्त फाफ डू प्लेसिसची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ क्रिकेटर