लवकरच इंग्लंडच्या द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर इंग्लंडमध्येच भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या दीर्घ दौऱ्याची सुरुवात होण्यासाठी अजून १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. तत्पुर्वी भारतीय क्रिकेटपटूंच्या इंग्लंडच्या भूमीतील कामगिरीवर क्रिकेटरसिकांच्या नजरा लागल्या आहेत.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली यांचे इंग्लंडच्या भूमितील प्रदर्शन दमदार राहिले आहे. याबरोबरच माजी भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनी याच्या नावेही इंग्लंडच्या मैदानावर एका मोठ्या विक्रमाची नोंद आहे. विशेष बाब अशी की, धोनीच्या कसोटी निवृत्तीच्या ६ वर्षांनंतरही त्याचा हा विक्रम अबाधित आहे.
माजी भारतीय कर्णधार धोनीला जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये गणले जाते. यष्टीरक्षणाबरोबर आपल्या धाकड फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीची बॅट इंग्लंडच्या भूमितही तळपली आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच मैदानांवर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक अर्धशतके करण्याचा किर्तीमान धोनीच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडमध्ये ७ कसोटी सामन्यांतील ८ डावात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना ८ वेळा ५० पेक्षा जास्त धावा चोपल्या होत्या. अर्थातच त्याने प्रत्येक डावात धावांची पन्नाशी पार केली होती.
या ८ कसोटी डावांमध्ये त्याने १००.६६ च्या सरासरीने ६०४ धावा केल्या होत्या. दरम्यान धोनीला एकही शतक झळकावता आले नाही. ९२ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली. परंतु २०१४ साली कसोटी निवृत्ती घेतल्यानंतरही त्याचा हा विक्रम कायम आहे.
धोनीनंतर या यादीत माजी भारतीय यष्टीरक्षक फारुख इंडिजनियर टॉप-५ मध्ये आहेत. त्यांनी ४ कसोटी सामन्यात ४ वेळा अर्धशतकापेक्षा जास्त धावा करत पाचव्या क्रमांकावर ताबा मिळवला होता. तसेच दक्षिण आफ्रिकाचे माजी यष्टीरक्षक जॉन वेट ६ अर्धशतकी खेळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक रॉड मार्श (६ वेळा ५० पेक्षा जास्त धावा) आणि चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकाचे जॅक कॅमरन (५ वेळा ५० पेक्षा जास्त धावा) आहेत.






