शुक्रवारी आयपीएल २०२० मधील १४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. आत्तापर्यंत चेन्नईने या आयपीएल हंगामात ४ सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामने गमावले आहेत. विशेष म्हणजे यातील २ सामन्यात संघाचा कर्णधार एमएस धोनी खेळपट्टीवर नाबाद होता. त्यामुळे आता धोनीच्या फिनिशरच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हैदराबादविरुद्ध धोनी नाबाद राहूनही चेन्नईचा पराभव
शुक्रवारीही धोनी ९ व्याच षटकात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी अनेकांना धोनी आता चेन्नईला सामना जिंकवून देईल असे वाटले होते. कारण चेन्नईला १६५ धावा करायच्या होत्या. आव्हान फार मोठे नव्हते. धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा ९.२१ च्या सरासरीने चेन्नईला धावांची आवश्यकता होती. अशावेळी धोनी हा सर्वोत्तम पर्याय होता. पण नेहमीप्रमाणे यावेळी धोनीची जादू दिसली नाही.
गेल्या काही वर्षात धोनी फलंदाजी करताना जर शेवटपर्यंत टिकला तर तो संघ सामना जिंकतोच हे समीकरण राहिले आहे. मात्र यावर्षीच्या आयपीएलमध्ये सामना जिंकवण्यात धोनी अपयशी ठरताना दिसत आहे. हैदराबादविरुद्धही धोनी शेवटच्या षटकापर्यंत नाबाद होता. मात्र त्याला आक्रमक खेळ करता आला नाही. शेवटच्या षटकातही २८ धावांची गरज असताना धोनीला मोठे फटके खेळण्यात अपयश आले. याचा फटका चेन्नई संघाला सध्या बसत आहे.
राजस्थान, दिल्ली विरुद्धही धोनी अपयशी –
याआधीही राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनीने २१७ धावांचे भलेमोठे आव्हान असतानाही धिम्यागतीने फलंदाजी केली होती. त्या सामन्यात तो ७ व्या क्रमांकावर जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा चेन्नईला १६.२६ च्या धावगतीने धावा करायच्या होत्या म्हणजेच ३८ चेंडूत १०३ धावा करायच्या होत्या.
पण अशा वेळी एका बाजूने डु प्लेसिस फटकेबाजी करत असताना धोनीने आक्रमकता न दाखवत १९ व्या षटकापर्यंत १२ चेंडूत केवळ ९ धावा केल्या. त्यातच १९ व्या षटकात डु प्लेसिस ७२ धावा करुन बाद झाल्यानंतर अखेर चेन्नईसाठी विजय आवाक्याबाहेर गेला. त्यांना शेवटच्या षटकात ३८ धावांची गरज होती. पण या षटकात धोनीने टॉम करनच्या गोलंदाजीवर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग ३ षटकार ठोकले आणि पराभवाचे अंतर कमी केले. परंतु धोनीने इतक्या उशीरा आक्रमकता दाखवल्याने अनेकांनी त्यावर टिका केली. कारण जर धोनीने १८ किंवा १९ व्या षटकात ही आक्रमकता दाखवली असती तर कदाचीत चेन्नईसाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला असता.
तसेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही धोनीने आक्रमक सुरुवात केली; मात्र तो शेवटच्या षटकात बाद झाला. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये धोनी नाबाद असतानाही चेन्नईला केवळ सहाव्यांदा पराभव स्विकारावा लागला आहे. विशेष म्हणजे यातील २ पराभव यंदाच्या हंगामातील आहेत.
त्यामुळे कुठेतरी धोनीची फलंदाजीतील आक्रमकता कमी पडत चालल्याचे दिसून येत आहे. याच धोनीने याआधी अनेकदा अशक्य वाटणारे विजय संघाला स्वत:च्या फलंदाजीच्या जोरावर मिळवून दिले आहेत. शेवटच्या चेंडूवरही षटकार मारण्यासाठी धोनी प्रसिद्ध आहे. २०१६ मध्ये याच धोनीने एका षटकात २३ धावा करुन रायझिंग पुणे सुपरजायंटला विजय मिळवून दिला होता. त्यानंतरही अनेकदा धोनीने अफलातून फटकेबाजी केली आहे. पण यंदा मात्र धोनीची कामगिरी खालवलेली दिसून आली. तसेच तो दमलेलाही दिसला. यामागे त्याचे वाढते वय आणि मागील १ वर्षे क्रिकेटपासून मिळालेली विश्रांती कारणीभूत असण्याचीही शक्यता आहे. पण धोनीची यंदाची कामगिरी पाहून धोनीचा शेवटच्या षटकात सामना जिंकवण्याचा ‘धोनी पॅटर्न’ फ्लाॅप होतानाच दिसतोय.