चेन्नई सुपर किंग्सचा आज गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल २०२६ मधील अखेरचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच महेंद्रसिंह धोनीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. धोनी अचानक रांचीला परतल्याने चाहत्यांमध्ये निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. पण आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे.
१८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेपॉकवर सामना खेळला होता. त्या वेळी धोनी संघासोबत मैदानात दिसला, मात्र तो सामना खेळला नव्हता. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अंगठ्याच्या दुखापतीमुळे धोनी रांचीला परतला आहे.
माहितीनुसार, जर चेन्नई सुपर किंग्स बाद फेरीत पोहोचली तर धोनी पुन्हा संघात सामील होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी माहीने आयपीएलमधून निवृत्ती घेतलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे.
या हंगामाच्या सुरुवातीलाच धोनीला पोटरीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अनेक सामने मुकावे लागले. २८ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत माहिती देत सांगितले होते की, पोटरीच्या दुखापतीमुळे तो किमान दोन आठवडे बाहेर राहू शकतो. मात्र ती दुखापत इतकी गंभीर ठरली की धोनीला संपूर्ण साखळी टप्प्यात सातत्याने खेळता आले नाही.
आता हंगामाच्या शेवटी त्याच्या अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. त्यामुळे जर चेन्नई सुपर किंग्स बाद फेरीत पोहोचली, तर धोनी पुनरागमन करतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये २७८ सामने खेळले आहेत. २४२ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या धावगतीने ५४३९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २४ अर्धशतके असून नाबाद ८४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.






