भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (ms dhoni) याने २०१४-१५ च्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. या मालिकेदरम्यान एक सामना खेळायचा बाकी होता आणि अशातच धोनीने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांनंतर त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. धोनीने खेळलेला हा शेवटचा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.
त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या ६ शतक आणि ३३ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. तत्पूर्वी धोनीने २००६ मध्ये देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणाचे संकेत दिले होते.
धोनीच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर ती एकूण ९ वर्षांची राहिली आहे. पण त्याची ही कारकीर्द त्याच्या पदार्पणानंतर एका वर्षातच संपू शकत होती. भारताचे माजी खेळाडू वीवीएस लक्ष्मण (vvs laxman) यांनी धोनीच्या कसोटी निवृत्तीशी संबंधीत एक जुना किस्सा सांगितला आहे.
लक्ष्मणने २०२० मध्ये स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताता सांगितले होते की, २००६ मध्येच धोनीने त्याच्या कसोटी निवृत्तीचा उल्लेख केला होता. २००६ साली धोनीने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्याचे पहिले कसोटी शतक केले होते. त्याने या सामन्यात १५३ चेंडूत १४८ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात विजय मिळवला होता. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये येऊन धोनीने त्याच्या निवृत्तीविषयी भाष्य केले होते, असे लक्ष्मणने सांगितले.
लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “मला अजूनही लक्षात आहे की, तो ड्रेसिंग रूममध्ये परत आला होता आणि मोठ्याने म्हणत होता की, मी माझ्या निवृत्तीची घोषणा करणार आहे. मी कसोटीत शतक केले. बास यार… मला कसोटी क्रिकेटकडून अजून काहीच नको आहे. हे ऐकून आम्ही हैराण राहिलो होतो, पण एमएस धोनी पहिल्यापासून असाच होता.”
दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध हा सामना संपल्यानंतर जरी धोनीने त्याच्या कसोटी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली असली, तरी त्याने पुढे कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली. कसोटी कारकिर्दीत २००८ साली धोनीने पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले. धोनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्याने नेतृत्व केलेल्या ६० कसोटी सामन्यांपैकी २७ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला. तसेच आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार बनला होता.
धोनी भारतीय संघाचा एकमेव कर्णधार ठरला, ज्याने संघाला तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिली. धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिल्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते. त्यानंतर संघाला २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपदही धोनीनेच जिंकवून दिले होते. तसेच २०१३ मध्ये धोनीच्याच नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
महत्वाच्या बातम्या –
ड्वेन ब्रावो म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले, हा देश माझ्या हृदयाच्या खूप जवळ”
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ‘ऍशेस’