पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ४६ वा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना चेन्नईने १३ धावांनी जिंकून हंगामातील तिसरा विजय नोंदवला. या सामन्यातून एमएस धोनी याने कर्णधार म्हणून पुनरागमन केले. याबद्दल त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर आयपीएल २०२२ हंगाम (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद (CSK Captain) सोडून ही जबाबदारी रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवली होती. मात्र, पहिल्या ८ सामन्यांनंतर जडेजाने वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देत ही जबाबदारी पुन्हा एकदा धोनीकडे (MS Dhoni) सोपवली. धोनीनेही जबाबदारी पुन्हा हाती घेताच चेन्नईने विजय मिळवला. या विजयानंतर धोनी म्हणाला आहे की, आयते सर्व काही देऊ शकत नाही.
धोनी सामन्यानंतर म्हणाला, ‘माझ्या आणि जडेजाच्या बाबतीत, सांगायचे झाले, तर जडेजाला गेल्यावर्षीच माहित होते की, त्याला यावर्षी कर्णधारपद मिळणार आहे. त्याला माहित होते आणि त्याला यासाठी तयार होण्यास पुरेसा वेळ होता. महत्त्वपूर्ण गोष्ट ही होती की, जडेजाने नेतृत्व करावे असे वाटत होते आणि मला हा बदल व्हावा असंच वाटत होतं.’
धोनी पुढे म्हणाला, ‘पहिल्या २ सामन्यांत मी जडेजाला मदत केली. पण त्यानंतर मी नेतृत्वाची जबाबदारी त्याच्यावर सोडली. त्याला त्यावेळी निर्णय घ्यायचा होता की गोलंदाजांचा वापर कसा करायचा आहे, कसे क्षेत्ररक्षण सजवायचे आहे. कारण हंगाम संपल्यानंतर त्याला असे वाटू नये की, नेतृत्व कोणी दुसऱ्याने केले आणि मी केवळ नाणेफेकीसाठी जात होतो. त्यामुळे हे हळूवार होणारे संक्रमण होते. कर्णधाराला सर्व चमच्याने भरवल्याने काही मदत होत नाही. मैदानावर तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि त्या निर्णयांची जबाबदारी घ्यावी लागेल.’
जडेजाच्या वैयक्तिक कामगिरीबद्दलही धोनीने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘मी पाहिले की, कर्णधारपदामुळे जडेजाचा वैयक्तिक खेळ प्रभावित होत आहे. मला जडेजा फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून आवडतो. जर तुम्ही कर्णधारपद सोडून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सर्वश्रेष्ठ देऊ शकत असाल तर माझ्यासाठी चांगले आहे. आम्ही एका चांगल्या क्षेत्ररक्षकाची कमी भासत आहे. मिड-विकेटवर एक चांगल्या क्षेत्ररक्षकाची कमी भासत आहे.’
तसेच धोनीने फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे कौतुक केले. तसेच त्याने सांगितले की, ‘मी माझ्या गोलंदाजांना सांगितले की, तुम्हाला एकाच षटकात ४ षटकार लागू शकतात. पण उरलेले २ चेंडू जे तुम्ही वाचवाल, तेच मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात तुम्हाला विजयासाठी मदत करणार आहेत.’
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईच्या विजयानंतरही रोहित आणि प्रशिक्षक जयवर्धने ट्रोल; कारण आहे ‘हा’ खेळाडू
एकच टाकला, पण सॉलिड टाकला! आयपीएल २०२२मधील सर्वात वेगवान चेंडू उमरान मलिकच्या नावावर, पण…
मोहसिनने दांडी गुल करताच तंबूकडे पळत सुटला रिषभ पंत