इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला रविवारपासून (१९ सप्टेंबर) दुबई येथे सुरुवात झाली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्सने २० धावांनी शानदार विजय मिळवत गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. असे असले तरी, या सामन्यात चेन्नईचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू हातावर चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त झाला होता. सामन्यानंतर कर्णधार धोनीने त्याच्या दुखापतीविषयी महत्त्वाची माहिती दिली.
रायुडू झाला होता जायबंदी
सामन्याच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अंबाती रायुडूने धावा काढण्यासाठी ऑफ साईडला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. पण मिल्नेने एक उसळता चेंडू टाकला, ज्याचा अंदाज रायडूला आला नाही. चेंडू थेट रायुडूच्या हाताला लागला आणि त्यामुळे तो वेदनेने व्हिवळताना दिसला. फिजिओने लगेचच मैदानावर हजेरी लावली आणि थोड्या चर्चेनंतर, रायुडूने सतत वेदना होत असल्यानचे सांगून मैदानावरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला. रायूडू तीन चेंडू खेळून एकही धाव काढू शकला नव्हता.
धोनीने दिली महत्वाची माहिती
सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात धोनीला रायूडूच्या दुखापतीबाबत विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना धोनी म्हणाला,
“आता तरी तो हसत आहे. याचा अर्थ त्याचे हाड मोडले नाही. मात्र, परिस्थितीवर सर्व काही अवलंबून असेल. पुढचा सामना खेळण्यासाठी आणखी चार दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे, मला आशा आहे की तो पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.”
रायूडू चेन्नईच्या सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाजांपैकी एक मानला जातो. यापूर्वी मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा रायूडू २०१८ पासून चेन्नईचा सदस्य आहे.
चेन्नईचा शानदार विजय
खराब सुरुवातीनंतर ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक व ड्वेन ब्रावो आणि रवींद्र जडेजा यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर चेन्नईने १५७ भावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या धावणे गती पकडली नाहीच. मुंबईचे सर्व प्रमुख फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. अनुभवी सौरभ तिवारीने मुंबईसाठी सर्वाधिक धावा बनविल्या. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईने अखेरीस 20 धावांनी विजय संपादन केला. सामनावीर म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड केली गेली.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज
मुंबईविरुद्ध सामना जिंकला, पण चेन्नईला मोठा धक्का, रायडू फलंदाजी करताना झाला जखमी, पाहा व्हिडिओ
‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय






