भारतीय क्रिकेट विश्वात एमएस धोनी हे मोठे नाव आहे. माजी भारतीय कर्णधार असलेल्या धोनीने त्याच्या कारकिर्दीत फलंदाजी आणि यष्टीरक्षणातच नाही तर नेतृत्व करतानाही यशाची मोठी शिखरे गाठली आहेत. धोनी हा भारतातच नाही तर अनेक देशात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. त्यामुळे चाहत्यांच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्यात रस असतो. नुकताच त्याचा एक जूना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने त्याच्या पहिल्या क्रशचे नाव सांगितले आहे.
युट्यूबवरील न्यूजटूडेच्या चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघातील काही खेळाडू धोनीबरोबर एका कार्यक्रमानिमित्त स्टेजवर बसलेले दिसत आहेत. यावेळी एक अँकर धोनीला विचारतो की त्याची पहिली क्रश म्हणजेच त्याला आवडलेली पहिली मुलगी आठवते का? त्यावर धोनी हो, दहावीत असताना, असे म्हणतो. त्यानंतर अँकर धोनीला तिचे नाव एका कागदाच्या तुकड्यावर लिहायला सांगतो.
त्यानंतर तो अँकर त्या मुलीचे नाव ओळखण्याचा प्रयत्न करतो, यावेळी तो धोनीला तिच्या नावात किती अक्षरे आहेत, तिच्या नावात ‘A’ हे अक्षर आहे का, असे विचारतो. त्यानंतर तो अँकर त्या मुलीचे नाव लिहून त्यावर कॅमेरापर्सनला झूम करण्यास सांगतो. यावेळी धोनीला डोळे झाकण्यास त्याने सांगितलेले असते. तो अँकर धोनीला माईकमध्ये नाव सांगण्यास सांगतो तेव्हा धोनी त्याला सांगतो की त्याने लिहिलेले नाव बरोबर आहे. अँकरने ‘स्वाती’ असे नाव लिहिलेले होते. तसेच धोनीने सांगितले की तो तिला १२ वीमध्ये असताना १९९९ साली शेवटचे भेटला.
हे नाव पाहिल्यानंतर धोनी त्या अँकरला गमतीने हसत म्हणतो, की ‘आता ही गोष्ट माझ्या पत्नीला सांगू नको.’ धोनीचे हे वाक्य ऐकून तिथे बसलेले सर्वचजण हसतात.
https://www.youtube.com/watch?v=W3uYMfglHGE&t=244s
धोनी सध्या आयपीएल २०२१ हंगाम स्थगित झाल्याने रांचीमध्ये परतला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या हंगामात चेन्नईने शानदार कामगिरी केली. हा हंगाम स्थगित होण्यापूर्वी चेन्नई संघ ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता.
धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द
धोनीने मागीलवर्षी १५ ऑगस्टरोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने २०१३ सालामध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध २२४ धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ३५० वनडे सामने खेळले असून यात त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतकांसह ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने ९८ टी२० सामन्यात २ अर्धशतकांसह १६१७ धावा केल्या आहेत.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे ८२९ विकेट्स घेतल्या आहेत.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी
धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २११ सामने खेळले असून ४०.२५ च्या सरासरीने ४६६९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २३ अर्धशतके केली आहेत. तसेच आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा तो यष्टीरक्षक आहे. त्याने आयपीएलमध्ये २०४ डावात यष्टीरक्षण केले असून यष्टीमागे १५३ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या ११४ झेलांचा आणि ३९ यष्टीचीतचा समावेश आहे.
महत्त्वात्या बातम्या –
मोठी बातमी! इंग्लंडला जबरदस्त धक्का, ‘या’ महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून जोफ्रा आर्चर बाहेर
धोनीने अवघ्या सातव्या सामन्यात उंचावलेलली आयसीसी ट्रॉफी, तर विराट ‘इतके’ सामने खेळून अजून प्रतिक्षेत
‘ही’ आहे भारतीय महिला संघाची ‘लेडी धोनी’, एकसारखीच आहे कहाणी