इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम शनिवारपासून (19 सप्टेंबर) सुरू होत आहे आणि स्पर्धेचा अंतिम सामना 10 नोव्हेंबर ला खेळला जाईल. या स्पर्धेचा पहिला सामना 3 वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि चार वेळा चषकावर नाव कोरलेल्या मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. प्रत्येकजण पहिला सामना पाहायला उत्सुक आहे.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी 14 महिन्यांनंतर व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे. त्याने आपला शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध 2019 च्या वनडे विश्वचषकात खेळला होता. यानंतर गेल्या महिन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
उद्या धोनी सामना खेळायला मैदानात उतरेल तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्याची संधी त्याच्याकडे असेल. धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या समोर परदेशी क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि डिव्हिलियर्स हे फलंदाज आहेत. डिव्हिलियर्सने आतापर्यंत 212 षटकार ठोकले आहेत.
त्याचबरोबर धोनीच्या नावावर 209 षटकार आहेत. जर मुंबईविरुद्ध 4 षटकार मारण्यात धोनीला यश आले तर तो डिव्हिलियर्सला मागे टाकेल. किंग्ज इलेव्हन संघाचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर 326 षटकार आहेत. हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजाला सध्यातरी सोपे नाही.
आयपीएलमधील धोनीच्या विक्रमाविषयी बोलायचं झालं तर कर्णधार म्हणून धोनीने सर्वाधिक सामने खेळले आहेत. त्याने 10 हंगामात चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व केले आहे आणि एका हंगामात रायझिंग पुणे सुपरगिजंट्सचे नेतृत्व केले आहे. त्याने एकूण 174 सामन्यांचे नेतृत्व केले आहे. 2017 मध्ये तो पुणे संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ पुणे संघाचा कर्णधार होता. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नई संघाला तीन वेळा चॅम्पियन बनवले आहे.