भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जिवनातील वेगवेगळ्या पैलूविंषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. धोनीने सामान्य कुटुंबातून येऊन भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार बनण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. हा कॅप्टनकूल फक्त भारतीय संघाचा नव्हे, तर आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचाही यशस्वी कर्णधार आहे. त्याने मधली दोन वर्ष सोडून २००८पासून ते २०१९पर्यंत आपल्या सीएसके संघाचे नेतृत्व केले आहे आणि तो अद्यापही संघाचा कर्णधार आहे.
या १२ हंगामांच्या आयपीएल प्रवासामध्ये धोनीने ३ वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. परंतु, या तिन्ही विजयावेळी धोनी त्याच्या जिवनाच्या ३ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होता. MS Dhoni’s Life 3 different stages of ipl trophy.
अविवाहित असताना जिंकली होती पहिली आयपीएल ट्रॉफी
धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पहिल्यांदा २०१०मध्ये म्हणजेच आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात विजय मिळवला होता. २५ एप्रिल २०१०मध्ये मुंबई इंडियन्सला २२ धावांनी पराभूत करत धोनीने चषकावर आपले नाव कोरले होते. त्यावेळी धोनी हा भारतीय संघातील सर्वाधिक पात्रता असणारा अविवाहीत (बॅचलर) क्रिकेटपटू होता. या एकमेव अंतिम फेरीत सीएसकेने मुंबईला धुळ चारली होती.
नवविवाहित असताना जिंकली होती दुसरी आयपीएल ट्रॉफी
२०११मध्ये सीएसकेने सलग दुसऱ्यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले होते. यावेळी २८ मे २०११ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ५८ धावांनी पराभूत करत त्यांनी हा कारनामा केला होता. मात्र, २०१० ते २०११ या काळात धोनीच्या वैयक्तिक जिवनात खूप बदल झाले होते. त्याने २०१०मधील विजयानंतर जुलै महिन्यात साक्षी धोनीशी लग्न केले. दुसरा चषक जिंकताना तो नवविवाहित क्रिकेटपटू होता.
वडील असताना जिंकली होती तिसरी आयपीएल ट्रॉफी
धोनीच्या आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घालण्याची संधी ७ वर्षांनंतर आली. आयपीएलच्या ११व्या हंगामात २ वर्षांच्या बंदीनंतर सीएसकेने तिसऱ्यांदा चषकावर आपले नाव कोरले होते. यावेळी २७ मे २०१८मध्ये सनराइजर्स हैद्राबादला २ विकेट्सने पराभूत करत सीएसकेने हा कारनामा केला होता. यादरम्यान धोनी हा एका मुलीचा पिता बनला होता. त्याला ६ फेब्रुवारी २०१५ला मुलगी झाली होती. तिचे नाव झिवा आहे.