भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ असल्याने मालिका चुरशीची होऊ शकते. सध्या या मालिकेची जोरदार तयारी दोन्ही संघ करत आहेत. त्याचवेळी, चाहत्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या दुसऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत प्रतिदिनी ३०,००० चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी दिली आहे. हा सामना २६ ते ३० डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल.
एमसीजीवर येणार दररोज ३०,००० चाहते
कोरोना महामारीमुळे अनेक क्रिकेट स्पर्धा या बंद दाराआड खेळवल्या गेल्या. त्यामध्ये प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी नव्हती. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत प्रेक्षक मैदानावर दिसत होते. आता आगामी कसोटी मालिकेतही चाहत्यांना मैदानात हजर राहण्याची मुभा मिळाली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करत दिली माहिती
‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी ज्यादा प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे,
‘आम्ही एमसीजीवर येणाऱ्या चाहत्यांचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत. आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, ‘बॉक्सिंग डे’ कसोटी पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पहिल्यांदा २५,००० असलेली ही संख्या आता ३०,००० करण्यात येतेय.’
इतर कसोटींमध्येही असेल चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी
‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ मधील पहिल्या ऍडलेड कसोटीत दर दिवशी मैदान क्षमतेच्या निमपट प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी आहे. सिडनी येथे ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही दर दिवशी मैदान क्षमतेच्या निम्मे प्रेक्षक मैदानात हजर राहू शकतात. मालिकेतील अखेरचा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. या सामन्यासाठीही दररोज ३०,००० चाहते उपस्थित राहतील.
दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा २-१ ने पराभव केला होता. त्यानंतर तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने विजय मिळवत पुनरागमन केले होते.