काही दिवसांपुर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका) सुरुवात झाली असून भारताला पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऍडलेड येथे झालेल्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकते. अशात भारतीय संघाचे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी संघातील स्थानांविषयी आपले मत मांडले आहे.
२६ डिसेंबर- ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना रंगणार आहे. पालकत्त्व रजेमुळे भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली या सामन्यात अनुपस्थित असेल. त्यामुळे केएल राहुलला सलामीला न पाठवता सहाव्या स्थानी पाठवण्यात यावे. तर, सहसा खालच्या फळीत फलंदाजीस येणाऱ्या हनुमा विहारीला वरच्या क्रमांकावर संधी द्यावी, असे प्रसाद यांचे म्हणणे आहे.
सहाव्या स्थानी राहुलने करावी फलंदाजी
पीटीआय न्यूज एजन्सीशी बोलताना प्रसाद म्हणाले की, “विहारीची फलंदाजी शैली खूप उत्कृष्ट आहे. यामुळे तो दिर्घकाळ मैदानावर टिकून फलंदाजी करू शकतो. त्यामुळे विहारीने दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी. तो एक निर्भिड खेळाडू आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तसेच राहुलसाठी सहावे स्थान अधिक योग्य असेल. महत्त्वाचे म्हणजे, विराट उर्वरित सामन्यांचा भाग नसल्यामुळे विहारी आणि राहुलला खुलून त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.”
महत्त्वाचे म्हणजे, पहिल्या कसोटी सामन्यात विहारी प्रभावी फलंदाजी करू शकला नव्हता. पहिल्या डावात त्याने फक्त १६ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो निम्म्या म्हणजेच ८ धावांवर माघारी परतला होता. अशाप्रकारे दोन्ही डावात मिळून त्याने फक्त २४ धावा केल्या होत्या.
साहाऐवजी पंतचे केले समर्थन
एवढेच नव्हे तर, प्रसाद यांनी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला पाठिंबा दिला. पंतने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दुसऱ्या सराव सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. या सामन्यात त्याने ९ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १०३ धावा केल्या होत्या.
“पंतने गेल्या काही महिन्यात त्याच्या फिटनेसमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. तो गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात चांगल्या लयीत होता. अशात उर्वरित तीन कसोटी सामन्यात पंतला संधी दिल्यास मी भारतीय संघ व्यवस्थापनाचे समर्थन करेल,’ असे पुढे बोलताना प्रसाद म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
पुढच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया संघालाच भारतात आणू, फॅन्सच्या मजेशीर प्रश्नाला सोनू सूदचं उत्तर