भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने गुरुवारी (१५ एप्रिल) खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली. ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठीचा हा करार जाहीर करण्यात आला. यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना ए प्लस या सर्वोच्च श्रेणीचा करार मिळाला आहे. तर रवींद्र जडेजा, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंना ए श्रेणीत स्थान मिळाले आहे.
मात्र या करारावरून काही माजी खेळाडूंनी नाराजी प्रकट केली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वाॅनने नुकतीच रवींद्र जडेजाला ए प्लस श्रेणीत स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. आता भारताचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी देखील या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ए श्रेणीत दहा खेळाडूंना स्थान
बीसीसीआयच्या वार्षिक करारात ए प्लस श्रेणीत तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहेत. ज्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. तर ए श्रेणीत एकूण दहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात आर अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत व हार्दिक पंड्या हे खेळाडू सामील आहेत.
“जडेजा ए प्लस श्रेणीचा हकदार”
मात्र या करारावरून भारताचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलतांना प्रसाद म्हणाले, “रवींद्र जडेजा निश्चितच ए प्लस श्रेणीचा हकदार होता. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळतो. तसेच त्याचे आयसीसी क्रमवारीतील स्थान देखील नेहमीच चांगले असते. त्यामुळे त्याला ए प्लस श्रेणीतच जागा मिळायला हवी होती. जडेजाचा या श्रेणीत समावेश का करण्यात आला नाही, यामागचे कारण मला तरी समजले नाही.”
महत्वाच्या बातम्या:
दीपक चहरने विनंती करूनही का नाही घेतले डीआरएस? खुद्द धोनीनेच केला खुलासा
SRHच्या विजयाची नौका आज तरी होणार का पार? अशी असेल वॉर्नर-रोहितची पलटण






