काल (१६ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने यंदाच्या आयपीएलमधील आपला पहिला विजय नोंदवला. त्यांनी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जच्या संघाला ६ गडी राखून पराभूत केले. वेगवान गोलंदाज दीपक चहरने या सामन्यात ४ बळी घेत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
मात्र त्याच्या गोलंदाजी दरम्यान एक वेळ अशीही होती जेव्हा दीपकला एकाच षटकात तीन बळी घेण्याची संधी होती. मात्र त्याने विनंती करून देखील कर्णधार एमएस धोनीने डीआरएस घेतला नाही. आता सामन्यानंतर खुद्द धोनीनेच यामागील कारणाचा खुलासा केला आहे.
एकाच षटकात तीन बळी घेण्याची होती संधी
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी विशेषतः दीपक चहरने हा निर्णय सार्थ ठरवला. पाचव्या षटकातच पंजाबची ४ बाद १९ अशी अवस्था झाली होती. दीपकनेच या चारही फलंदाजांना बाद केले होते. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने ख्रिस गेलला आणि चौथ्या चेंडूवर निकोलस पूरनला बाद केले होते.
अशातच पाचव्या चेंडूवर त्याच्या इनस्विंगने शाहरूख खानला चकमा दिला आणि चेंडू थेट त्याच्या पॅडवर जाऊन आदळला. यावेळी पंचांकडे जोरदार अपील केली. मात्र पंचांनी त्याला नाबाद दिले. हे पाहून दीपक चहरने धोनीला डीआरएस घेण्याची विनंती केली. मात्र धोनीने त्याच्या विनंतीला नकार दिला. आता यामागील कारण समोर आले आहे.
धोनीनेच केला कारणाचा खुलासा
सामन्यानंतर धोनीला याबाबत विचारले असता तो म्हणाला, “माझ्या मते चेंडू खूप उंचावर लागला होता. त्यामुळे मी त्याला डीआरएस घ्यायला नकार दिला. मला नेहमीच वाटते की डीआरएस फक्त खेळातील मोठ्या चुका सुधारण्यासाठी आहे आणि विनाकारण जोखीम घेण्यासाठी नाही. तुम्ही तेव्हाच जोखीम घेऊ शकता जेव्हा कोणी महत्वाचा फलंदाज फलंदाजी करत असतो.”
असे असले तरी दीपक चहरच या सामन्याचा सामनावीर ठरला. चार षटकात केवळ १३ धावा देऊन ४ बळी घेतल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
SRHच्या विजयाची नौका आज तरी होणार का पार? अशी असेल वॉर्नर-रोहितची पलटण
ओळखलंत का? रियान परागचे हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी दिली मजेदार नावे






