अफगाणिस्तान संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये एक कसोटी सामना आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. कसोटी सामन्याने या मालिकेला सुरूवात होणार आहे. हा सामना मुल्लानपूरमध्ये शनिवारपासून (6 जून) खेळला जाणार आहे. या सामन्यात महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार, याचा खुलासा भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी केला आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या भारतीय संघाकडे पाहता कर्णधार शुबमन गिल आणि गंभीर यांच्याकडे तिसऱ्या क्रमांकासाठी दोन पर्याय आहेत, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल. या दोघांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये आणि नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आता गंभीर यांनी या एकमेव कसोटीसाठी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल, हे सांगितले आहे.
गंभीर यांनी शुक्रवारी (5 जून) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी फारशा संधी मिळाल्या नाहीत आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी देवदत्त पडिक्कलऐवजी साईला पसंती दिली जाईल, असे संकेतही दिले.
“साई सुदर्शनला योग्य संधी मिळालेली नाही. त्याने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आम्ही त्याला पुरेसा वेळ आणि संधी देऊ,” असे गंभीरने म्हटले आहे.
“आम्ही केवळ 11 खेळाडूंची निवड करू शकतो आणि साई खराब फॉर्ममध्ये नाही. त्याने आयपीएलमध्ये 700 धावा केल्या आहेत. जर आपण 4-5 सामन्यांच्या आधारावर साईचे मुल्यमापन केले, तर आपण कधीच काहीही ठरवू शकणार नाही,” असेही गंभीरने पुढे म्हटले आहे.
गंभीरने संघ श्रीलंका दौऱ्यासाठी चार फिरकी गोलंदाजाच्या तयारीत असून त्याची सुरूवात या कसोटीनेच होणार आहे. त्याबद्दल गंभीर म्हणाला, “मानव सुथार आणि हर्ष दुबे हे डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असल्याने, श्रीलंकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला फिरकी गोलंदाजीचे अनेक पर्याय तयार ठेवावे लागतील.”
अफगाणिस्तान विरुद्धचा हा कसोटी सामना आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा भाग नाही.
भारतीय कसोटी संघ विरुद्ध अफगाणिस्तान
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पड्डिकल, नीतिश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, हर्ष दुबे, केएल राहुल, ध्रुव जुरेल, रिषभ पंत, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार.






