इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला सुरुवात होऊन आठवडा झाला आहे. तसेच सर्व संघांचे प्रत्येकी २ सामने झाले आहेत. तसेच पहिल्याच आठवड्यात अनेक सामने शेवटच्या षटकापर्यंत गेले. आता या हंगामातील दुसऱ्या आठवड्यातील सामन्यांना सुरुवात होत आहे. शनिवारी(१७ एप्रिल) या हंगामातील ९ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे.
हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक क्रिकेटपटूंना काही विक्रम करण्याची संधी आहे. त्याच विक्रमांचा या लेखात आढावा घेऊ.
१. डेव्हिड वॉर्नरने जर या सामन्यात अर्धशतक केले तर तो आयपीएलमध्ये ५० अर्धशतके झळकावणारा पहिलाच क्रिकेटपटू बनेल. सध्या त्याच्या नावावर ४९ अर्धशतके असून त्याच्या पाठोपाठ ४२ अर्धशतकांसह शिखर धवन आहे.
२. वॉर्नरने जर या सामन्यात ४ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करेल. आत्तापर्यंत केवळ ख्रिस गेल(३५१), एबी डिविलियर्स(२३७), एमएस धोनी(२१६), रोहित शर्मा(२१५) आणि विराट कोहली (२०१) या पाच खेळाडूंनाच आयपीएलमध्ये २०० षटकार मारण्याचा कारनामा करता आला आहे.
३. मनिष पांडेने या सामन्यात २ षटकार मारताच तो आयपीएलमध्ये १०० षटकार पूर्ण करेल.
४. रोहितने जर २ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकेल. सध्या रोहितच्या नावावर २१५ षटकार आहेत, तर धोनीच्या नावावर २१६ षटकार आहेत.
५. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू किरॉन पोलार्डने आत्तापर्यंत १९८ षटकार मारले आहेत. त्यामुळे आणखी २ षटकार मारताच तो २०० षटकार पूर्ण करेल.
६. मुंबईचा कृणाल पंड्या आणि हैदराबादचा शाहबाज नदीम यांना आयपीएलमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी २ विकेट्सची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
SRHच्या विजयाची नौका आज तरी होणार का पार? ‘अशी’ असेल वॉर्नर-रोहितची पलटण
ओळखलंत का? रियान परागचे ‘हे’ छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी दिली मजेदार नावे
सामना गमावला तरीही ‘पावर हिटर’ शाहरुखने जिंकले प्रिती झिंटाचे मन, ट्विट करत म्हणाली…