पुणे। देशांतील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक 10वर्षांखालील गटांतील ‘प्रविण करंडक’ स्पर्धा, कोविडनंतर आता नव्या फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात येणार असून एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10 वर्षांखालील टेनिस सर्किट या स्पर्धेचे संपूर्ण राज्यभरात आयोजन करण्यात येणार आहे. या सर्किटमधील पहिली स्पर्धा ही बारामती क्लब टेनिस या ठिकाणी शनिवार 7 मे व रविवार 8 मे या दिवशी होणार आहे.
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किटच्या लोगोचे अनावरण प्रविण मसालेवालेचे अध्यक्ष व प्रविण करंडक स्पर्धेचे संस्थापक राजकुमार चोरडिया आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना एमएसएलटीएच्या समितीचे माजी सदस्य राजकुमार चोरडिया म्हणाले की, “आमच्या कंपनी राष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून याबरोबरच सुहाना ब्रँडसची उत्पादने देखील राष्ट्रीय ब्रँड झाली आहेत. यामुळेच आमच्या ब्रँडसारखेच 10वर्षांखालील टेनिस स्पर्धा एक नवी ब्रँड स्पर्धा करण्याची आमचा मानस आहे”.
चोरडिया पुढे म्हणाले की, “प्रविण करंडक टेनिस स्पर्धेचे सलग गेल्या 30वर्षांपासून आयोजन करण्यात येत असून मागील 2वर्षांच्या कोविड महामारीच्या संकटामुळे आम्हांला या स्पर्धेचे आयोजन करता आले नाही. पूण्यात हि स्पर्धा वर्षातून एकदा आयोजित करत असतो, पण यावेळी आम्ही एमएसएलटीएशी संलग्न होऊन एका स्पर्धेच्या ऐवजी 10वर्षांखालील टेनिस सर्किट स्पर्धा संपूर्ण राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एमएसएलटीएला या वयोगटातील गुणवान खेळाडू हेरून या खेळाडूंना भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी मदत मिळेल.
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट टेनिस 10वर्षांखालील टेनिस सर्किटमध्ये 15 स्पर्धांचे संपूर्ण राज्यभरात आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेतील कामगिरीनुसार अव्वल आठ खेळाडूंची निवड हि सुहाना 10 मास्टर्ससाठी करण्यात येणार आहे. याशिवाय 10वर्षांखालील अव्वल आठ खेळाडूंसाठी टेनिस प्रशिक्षण शिबिराचे तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येणार असून या निवड झालेल्या खेळाडूंना या शिबिरासाठी निमंत्रणदेखील असणार आहे.
प्रविण करंडक टेनिस स्पर्धेशी प्रारंभापासून जोडले गेलेले एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर या वेळी म्हणाले, की सुमारे 30 वर्षांपूर्वी टेनिस स्पर्धांचा दुष्काळच होता. टेनिस स्पर्धांचे आयोजन हे एक आव्हान होते. अशा काळात राजकुमार चोरडिया यांच्या सहकार्याने केवळ टेनिसचा प्रचार आणि प्रसार हे ध्येय ठेवून आम्ही प्रवीण करंडक स्पर्धेला प्रारंभ केला. राजकुमार चोरडिया यांच्या दूरदृष्टीलाच याचे श्रेय दिले पाहिजे.
सुंदर अय्यर पुढे म्हणाले, की स्थानिक स्तरावर सुरू झालेली ही स्पर्धा लवकरच राष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाची स्पर्धा बनली. इतकेच नव्हे तर भावी काळात या स्पर्धेतून अनेक डेव्हिस चषक व फेड चषक स्पर्धा गाजविणारे खेळाडू पुढे आले. दहा वर्षांखालील गटाची स्पर्धा आम्हीच पहिल्यांदा सुरू केली आणि नंतर ही स्पर्धाच आमची प्रमुख ओळख बनली.
प्रवीण मसालेवाले कंपनीचे संचालक आणि टेनिसप्रेमी विशाल चोरडिया म्हणाले, की आता तीन दशकांची समृद्ध परंपरा पाठीशी असल्यामुळे आणि आमच्या कंपनीचाही भारतभर विस्तार झाला असल्यामुळे या स्पर्धेचा भौगोलिक विस्तार करण्याची आमची योजना आहे. सध्या महाराष्ट्रात ही स्पर्धामालिका सुरू असली, तरी लवकरच ही 10 वर्षांखालील स्पर्धामालिका गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांमध्येही नेण्याची आमची योजना आहे. गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना आपली गुणवत्ता लहान वयातच सिद्ध करण्याची संधी मिळावी, असेही ध्येय आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून बाळगले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘नशीब कधी ना कधी बदलणार होतेच’, मुंबईच्या दुसऱ्या विजयानंतर कर्णधार रोहित खुश
भारतीय संघ इंग्लंडनंतर जाणार वेस्ट इंडिज दौऱ्याला, पाहा कसे असेल वेळापत्रक
मुंबईविरुद्ध सामना गमावला, पण गुजरातसाठी साहा-गिल जोडी ठरली ‘लय भारी’; रचली ऐतिहासिक भागीदारी