पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) यंदाचा मोसम कोरोनोच्या वाढत्या संक्रमणामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यात आले. गुरुवार रोजी (२४ जून) पीएसएलचा अंतिम सामना मुलतान सुलतान विरुद्ध पेशावर जाल्मी यांच्यात झाला. या सामन्यात मुलतान सुलताने ४७ धावांनी बाजी मारत पहिलेवहिले जेतेपद पटकावले.
अबुधाबी येथे झालेल्या अंतिम सामन्यात पेशावर जाल्मी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानचा मुलतान सुलतान संघ प्रथम फलंदाजी करण्यास आला होता. मुलतानच्या दोन्ही सलामीवीरांनी संघाला सुंदर सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी शान मसूद आणि मोहम्मद रिझवान यांनी ६८ धावांची भागीदारी केली. मसूद ३७ धावांवर बाद झाल्यानंतर सोहेब मकसूद फलंदाजी करण्यास आला.
पीएसएलच्या या मोसमात धमाकेदार प्रदर्शन करणारा सोहेब मकसूदने आपल्याच शैलीत फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ११व्या षटकात रिझवान बाद झाल्यानंतरही सोहेब मकसूदची आक्रमक फटकेबाजी चालूच राहिली. त्याला साथ दिली ती म्हणजे दक्षिण अफ़्रिकेचा फलंदाज रेली रुसोने. रुसोने धमाकेदार फलंदाजी करत २१ चेंडूत अर्धशतक ठोकले. १९व्या षटकात रुसो बाद झाल्यानंतर सोहेब मकसूदने अखेरपर्यंत डाव सावरला. त्याने ३५ चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. दरम्यान त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. २० षटकांनंतर मुलतान संघाची धावसंख्या ४ बाद २०६ इतकी होती.
मुलतान सुलतानच्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास उतरलेला पेशावर संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावा केल्या. परंतु, पुढे दोन्ही सलामीवीर एकामागोमाग ४२ धावांवर बाद झाले. गेल्या ४ सामन्यात ३ अर्धशतके करणारा हजरातु्ल्लाह जजईने अंतिम सामन्यात केवळ ६ धावा केल्या.
दरम्यान, पेशावर संघाचा अनुभवी फलंदाज शोईब मलिकने २८ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले. पण, मलिकला कोणीही साथ देऊ शकले नाही. शेवटच्या ४ षटकात ५८ धावांची गरज असताना इम्रान ताहीरच्या फिरकीने पेशावर संघाची पूर्णपणे वाट लावून टाकली. त्याने एकाच षटकात ३ गडी बाद करून सामन्याचा चेहरामोहराच बदलून टाकला.
परिणामी पेशावर संघ २० षटकात १५९ धावा करू शकला आणि ४७ धावांनी सामना जिंकून मुलतान सुलतान संघाने पहिल्यांदा पीएसएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सोहेब मकसूदला सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चँपियनशीप पराभवाच्या जखमेनंतर टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त
भारताच्या हारकिरीनंतर चाहत्यांचा शास्त्रींवर निशाणा, द्रविडला प्रशिक्षक बनवण्याच्या मागणीने धरला जोर