मागील वर्षी कोरोनामूळे भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम काहीसा उशिराने सुरू झाला होता. यावर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबर महिन्यातच महिला क्रिकेट स्पर्धां आयोजित करत हंगामाचा श्रीगणेशा केला. वरिष्ठ पुरुष क्रिकेटच्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार असून, सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी खेळली जाईल. नुकतीच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे या स्पर्धेसाठी आपल्या २० सदस्यीय संघाची घोषणा केली असून, यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना स्थान मिळाले आहे.
मुंबईच्या संघाची झाली घोषणा
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला ४ नोव्हेंबरपासून देशभरात सुरुवात होईल. ३८ क्रिकेट संघटना सहभागी होत असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना २२ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. तत्पूर्वी, भारतातील सर्वात मोठी व श्रीमंत क्रिकेट संघटना मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पर्धेसाठी आपल्या २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार व अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल. तर, युवा पृथ्वी शॉ याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे प्रमुख सलील अंकोला, गुलाम पारकर, सुनील मोरे, प्रसाद देसाई व आनंद यलवगी यांच्या उपस्थितीत या संघाची घोषणा केली गेली. मुंबई संघाचे सर्व सामने गुवाहाटी येथे होतील. तमिळनाडू या स्पर्धेचा गतविजेता आहे. मुंबईने २०१९ मध्ये ही स्पर्धा आपल्या नावे केली होती.
मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१ साठी मुंबईचा संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), आदित्य तरे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, सरफराज खान, प्रशांत सोळंकी, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, हार्दिक तामोरे, मोहित अवस्थी, सिद्धेश लाड, साईराज पाटील, अमन खान, अरमान जाफर, यशस्वी जयस्वाल, तनुष कोटियन, दीपक शेट्टी व रॉयस्टन डायस.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात चार चेंडूत चार बळी घेणाऱ्या कॅम्फरबद्दल ‘या’ गोष्ट माहितेय का?
युएईत विराटला मिळणार का ‘ती’ संधी; अकरा वर्षांपासून पाहतोय वाट
असंही होऊ शकत! नेदरलँड्सच्या पाच फलंदाजांनी भोपळा न फोडल्याने घडला मोठा इतिहास