मुंबई। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात महाराष्ट्र डर्बीचा पहिला सामना मुंबई सिटीने जिंकला. मुंबई फुटबॉल एरीनावर यजमान संघाने पुणे सिटीला 2-0 असे हरविले.
दुसऱ्या प्रयत्नात झालेला गोल आणि पेनल्टीचा फटका यानंतर मुंबईच्या बचावात्मक खेळाने पुणे सिटीला हताश केले. मुंबईच्या ल्युचियन गोऐन याने अखेरच्या क्षणी घेतलेली पेनल्टी पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याने अडविली, अन्यथा पुण्याला आणखी मोठा पराभव पत्करावा लागला असता.
मुंबईचे दोन्ही गोल पूर्वार्धात झाले. 25व्या मिनिटाला मोडोऊ सौगौ याने खाते उघडले. त्यानंतर पूर्वार्धात अखेरच्या मिनिटाला रफाएल बॅस्तोस याने पेनल्टी सत्कारणी लावली.
मुंबईने तिसऱ्या सामन्यात पहिलावहिला विजय नोंदविला. चार गुणांसह त्यांनी सहावे स्थान मिळविले. पुण्याला दुसऱ्या सामन्यात पहिला पराभव पत्करावा लागला. एका गुणासह ते नवव्या स्थानावर गेले.
25व्या मिनिटाला मुंबईने खाते उघडले. पाऊलो मॅचादोने मारलेला फटका डावीकडील क्रॉसबारला लागला. हा चेंडू उडून मोडोऊ सौगौ याच्यापाशी गेला, त्यावेळी पुणे सिटीचा गोलरक्षक विशाल कैथ बाजूला गेला होता. त्यामुळे मोडोऊ आरामात गोल करू शकला.
पूर्वार्धाच्या अंतिम टप्यात पुणे सिटीला लालच्छुन्माविया फानाई याच्या धसमुसळ्या खेळाचा फटका बसला. एमिलीयानो अल्फारो याने आगेकूच करून प्रयत्न केला होता. त्याची चाल अपयशी ठरल्यानंतर मुंबईने चेंडूवर ताबा मिळवित प्रतिआक्रमण केले. मोडोऊ चेंडूसह घोडदौड करीत असताना फानाईने त्याला पाडले. त्यामुळे मुंबईला पेनल्टी बहाल करण्यात आली. रफाएल बॅस्तोस याने या संधीचे सोने केले.
वास्तविक पुण्याने सुरवात चांगली केली होती. पहिल्याच मिनिटाला फानाई याने डावीकडून मुसंडी मारत कर्णधार अल्फारोच्या दिशेने चेंडू मारला, पण अल्फारोन वाकून हेडिंग केल्यावर चेंडू थोडक्यात बाहेर गेला. पाचव्या मिनिटाला मुंबईला फ्री किक मिळाली.
बॅस्तोसने मध्य क्षेत्रात चेंडू मिळवून घोडदौड केली होती, पण तो पुणे सिटीच्या सार्थक गोलुई आणि आदिल खान यांच्यात सापडून पडला. त्यामुळे मुंबईला फ्री किक मिळाली. मॅचादो याने मात्र क्रॉसबारवरून उंच मारलेला चेंडू थेट स्टँडमध्ये जाऊन पडला. दहाव्या मिनिटाला मॅचादोने घेतलेल्या फ्री किकवर अरनॉल्ड इसोको याने मारलेला फटका पुण्याच्या खेळाडूंनी ब्लॉक केला.
21व्या मिनिटाला पुण्याला संधी मिळाली होती. अल्फारोने आपल्या मार्करला चकवून डावीकडून बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याच्या पासवर निखील पुजारीने डाव्या पायाने मारलेला फटका मुंबईच्या शौविक घोष याने ब्लॉक केला. 28व्या मिनिटाला इसोकोने बॅस्तोसच्या पासवर फटका मारला, पण त्यात ताकद नव्हती. त्यामुळे कैथने चेंडू सहज अडविला.
मध्यंतरास दोन गोलांची भक्कम आघाडी असल्यामुळे मुंबईने दुसऱ्या सत्रात फारसा धोका पत्करला नाही. त्यामुळे पुण्याला चाली रचणे अवघड झाले. त्यात मॅचादोने एक प्रयत्न करून पुण्यावरील दडपण कायम ठेवले.
60व्या मिनिटाला पुण्याकडून दिएगो कार्लोसने डावीकडून आगेकूच करीत मार्सेलिनो याला पास दिला, पण मार्सेलिनोचा फटका थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षक अमरिंदर सिंगकडे गेला. 62व्या मिनिटाला रेनीयर फर्नांडीसचा फटका कैथने उजवीकडे झेपावत अडविला.
अंतिम टप्यात अल्फारो आणि कार्लोस यांना पुरेसे भेदक प्रयत्न करता आले नाहीत. मुंबईने बचावात्मक खेळ करीत आघाडी राखली. त्यामुळे दुसऱ्या सत्रात काहीसा नीरस खेळ झाला होता. त्यानंतर भरपाई वेळेत इसोकोला पाडण्यात आले. त्यामुळे मुंबईला पेनल्टी बहाल करण्यात आली. ल्युचीयन गोऐन याने नेटच्या डाव्या कोपऱ्याच्या दिशेने मारलेला फटका कैथने झेपावत थोपविला
महत्त्वाच्या बातम्या:
–नेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम
–Video: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली
–Video: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली