नवीन वर्षाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई सिटी एफसीने दणक्यात सुरुवात केली. हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये अपराजित असलेल्या एकमेव मुंबई सिटीने सोमवारी (2 जानेवारी) विजय मिळवला. मुंबई सिटीने यजमान ओडिशा एफसीवर 4-2 असा विजय मिळवताना तालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. हिरो आयएसएलच्या या पर्वातील ओडिशाचा घरच्या मैदानावरील हा पहिलाच पराभव ठरला. दोन गोल करणारा लालिआंझुआला छांग्टे नायक ठरला, त्याला बिपिन सिंग व अलबेर्टो नोग्युएरा यांच्या एक गोलची साथ मिळाली. छांग्टेने 1 गोलसाठी सहाय्यही दिले. ओडिशाकडून डिएगो मॉरिसिओने दोन गोल केले.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला बिपीन सिंगने गोल करण्याची संधी निर्माण केली, परंतु जॉर्ज डियाज वेळेत चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. मुंबई सिटीची आक्रमक सुरुवात पाहता यजमान ओडिशा एफसीने बचावफळी मजबूत केली. घरच्या मैदानावर यंदाच्या पर्वात ओडिशा एकही सामना गमावलेला नाही आणि आजही ओडिशाकडून तसेच प्रत्युत्तर पाहायला मिळाले. तिसऱ्या मिनिटाला त्यांच्याकडून ऑन टार्गेट प्रयत्न झाला, जो मुंबई सिटीचा गोलरक्षक फुर्बा लाचेंपाने सहज रोखला. दोन्ही संघ सुरुवातीपासूनच गोल करण्याच्या प्रयत्नात दिसले अन् 8व्या मिनिटाला लालिआंझुआला छांग्टेचा ऑन टार्गेट प्रयत्न ओडिशाचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने अडवला.
17 व्या मिनिटाला बिपिन सिंगला पेनल्टी क्षेत्रात पाडले गेले अन् मुंबईने पेनल्टीची मागणी केली, परंतु रेफरीने पेनल्टी देण्यास नकार दिला. त्यानंतर ओडिशाकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. त्यांनी सातत्याने मुंबईच्या पेनल्टी क्षेत्रावर चढाई केली आणि 25 व्या मिनिटाला नंदाकुमार सेकर गोल करण्याच्या अगदी जवळ आलाच होता. त्याला 6 यार्डावरून केवळ गोलरक्षकाला चकवायचे होते, परंतु त्याने मारलेला चेंडू पोस्टवरून गेला. ओडिशाने सामन्यातील सर्वात सोपी संधी गमावली. ओडिशाने आक्रमणासोबत सुरेख बचावही केला आणि त्यामुळे मुंबईचे खेळाडू किंचितसे निराश दिसले. 42व्या मिनिटाला बिपिनच्या पासवर डियाजने एक सोपा गोल करण्याची संधी गमावली. पुढच्या मिनिटाला ओडिशाचा गोलरक्षक पुढे निघून गेला अन् ग्रेग स्टीवर्टला चेंडूला दिशा द्यायची होती, पण मुंबई सिटीने दोन मिनिटांत दुसरी संधी गमावली.
पहिल्या हाफमध्ये मुंबई सिटीला मजबूत आघाडी घेता आली असती, परंतु सोप्या संधी गमावल्याने त्यांची पाटी कोरी राहिली. 45+2 मिनिटाला ग्रेग स्टीवर्टचा प्रयत्न अमरिंदरने रोखला अन् दोन्ही संघांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. मध्यंतरानंतर मुंबई सिटीच्या वाट्याला अपयश कायम राहिले. 49व्या मिनिटाला छांग्टेने 6 यार्डवर डियाजसाठी गोल करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु डियाजचा हा प्रयत्न गोलरक्षक अमरिंदरने चतुराईने अयशस्वी ठरवला. याहून सोपी संधी आतापर्यंत मिळाली नव्हती. पण, 55व्या मिनिटाला छांग्टेने अखेर गोल केलाच. यावेळी डियाजच्या पासवर छांग्टने मुंबई सिटीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण, 61व्या मिनिटाला डिएगो मॉरिसिओने बरोबरीचा गोल केला. व्हिक्टर रॉड्रीगेजने दिलेल्या सुरेख पासवर मॉरिसिओने मुंबई सिटीच्या गोलरक्षकासह तीन बचावपटूंना चकवले.
ओडिशाच्या कार्लोस डेल्गाडोने बचावात उल्लेखनीय योगदान दिले. 68व्या मिनिटाला अहमद जाहूचा फ्री किकवरील प्रयत्न अमरिंदरने रोखला, परंतु बिपिन सिंगने माघारी फिरलेला चेंडू गोलजाळीत पाठवून मुंबईला पुन्हा आघाडी मिळवून दिली. मुंबई सिटीकडून ही आघाडी अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न होताना दिसत असताना ओडिशा फारच बचावात्मक खेळ करत होते. त्यांच्याकडून बरोबरीसाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसले नाही. 79व्या मिनिटाला चेंडू रोखण्यासाठी अमरिंदर बॉक्सबाहेर आला, पण त्याच्या हातून चेंडू पुन्हा निसटला अन् छांग्टेने ही संधी साधून सामन्यातील वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसरा गोल केला. ओडिशाचा एकही बचावपटू जागेवर नसल्याने अमरिंदरला त्याची जागा सोडून पुढे यावे लागले. 85व्या मिनिटाला छांग्टेच्या पासवर अलबेर्टो नोग्युएराने मुंबईसाठी आणखी एक गोल केला. मुंबई सिटीने अपराजित मालिका कायम राखताना आजचा सामना 4-2 असा जिंकला. मॉरिसिओने 90+1 मिनिटाला ओडिशासाठी दुसरा गोल केला.
निकाल : मुंबई सिटी एफसी 4 (लालिआंझुआला छांग्टे 55 मि. व 79 मि., बिपिन सिंग 68 मि., अलबेर्टो नोग्युएरा 85 मि.) विजयी वि. ओडिशा एफसी 2 (डिएगो मॉरिसिओ 61 मि. व 90+1 मि. ).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केरळा ब्लास्टर्सची नव वर्षात विजयी सुरुवात; जमशेदपूरला नमवून गुणतालिकेत तिसरे स्थान
मानलं हार्दिकच्या कॅप्टन्सीला! अखेरच्या षटकात खेळलेला जुगार ठरला फायद्याचा; विजय झाला सुकर