---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीची पिछाडीवरून ब्लास्टर्सवर मात

On: बुधवार, फेब्रुवारी 3, 2021 10:41 PM
---Advertisement---

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने बुधवारी केरला ब्लास्टर्स एफसीला पिछाडीवरून 2-1 असे हरविले. याबरोबरच मुंबई सिटीने साखळीतील अव्वल स्थान आणखी भक्कम केले.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. ब्लास्टर्सकडे पूर्वार्धात एका गोलची आघाडी होती. मध्य फळीतील स्पेनचा 32 वर्षीय खेळाडू व्हिसेंट गोमेझ याने हा गोल केला. उत्तरार्धात मुंबई सिटीने पारडे फिरविले. मध्य फळीतील मणीपूरचा 25 वर्षीय खेळाडू बिपीन सिंग याने मुंबई सिटीला दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच व एकूण 46व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर आघाडी फळीतील ब्रिटनचा 34 वर्षीय खेळाडू अॅडम ली फाँड्रे याने 67व्या मिनिटाला पेनल्टीची सुवर्णसंधी साधली.

मुंबई सिटीने 15 सामन्यांत दहावा विजय मिळविला असून तीन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 33 गुण झाले. एटीके मोहन बागानवर त्यांनी सहा गुणांची आघाडी घेतली आहे. एटीकेएमबीचा एक सामना बाकी असून 14 सामन्यांतून आठ विजयांसह 27 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. हैदराबाद एफसी 15 सामन्यांतून 22 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांचे प्रत्येकी 21 गुण आहेत. यात गोव्याचा 5 (19-14) गोलफरक नॉर्थईस्ट युनायटेडच्या 1 (19-18) पेक्षा सरस आहे. त्यामुळे गोव्याचा चौथा क्रमांक आहे.

ब्लास्टर्सला 16 सामन्यांत सातवा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण व शेवटून तिसरे नववे स्थान कायम राहिले.

खाते उघडण्याची शर्यत ब्लास्टर्सने जिंकली. 27व्या मिनिटाला ब्लास्टर्सला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक साहल अब्दुल समद याने घेतला. त्याने मारलेला चेंडू नेटच्यासमोर येताच गोमेझने अचूक टायमिंगसह हेडिंग करीत मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याला चकविले.

दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी अॅडमने उजवीकडे मध्यरक्षक सी गोडार्डला पास दिला. गोडार्डने मुसंडी मारली. त्याने कोस्टा न्हामोईनेस्कू याला चकविले आणि बिपीनला पास दिला. बिपीनने अवघड कोन असूनही तसेच ब्लास्टर्सचा बचावपटू संदीप सिंग याचे दडपण असूनही फिनिशींग केले.

65व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा बचावपटू कोस्टा न्हामोईनेस्कू याने मुंबई सिटीचा स्ट्रायकर अॅडम याला गोलक्षेत्रात पाडले. त्यामुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी मुंबई सिटीला पेनल्टी बहाल केली. अॅडमने नेटच्या उजव्या बाजूला तळात चेंडू मारला.

संबधित बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालविरुद्ध अखेर बेंगळुरूला विजय

आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून जमशेदपूरच्या आशा कायम

आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानचा ब्लास्टर्सवर पिछाडीवरून विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---