मुंबई, 6 मार्च: लीग शिल्ड विजेता मुंबई सिटी एफसीचा संघ हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 ( आयएसएल) मध्ये उपांत्य फेरीत दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर सलग 9 विजय मिळवून अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या बंगळुरू एफसीचे आव्हान आहे. उपांत्य फेरीच्या पहिला लेग सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर होणार असल्याने यजमान त्याचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी प्रयत्नशील नक्कीच असतील. पण, मुंबई सिटीला मागील दोन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे आणि त्यात एक पराभव हा बंगळुरूविरुद्धचाच आहे. त्यामुळे मुंबई सिटी त्याची सव्याज परतफेड देण्यासाठी तयार आहेत. बंगळुरूने सलग 9 विजय नोंदवताना सर्वांचेच टेंशन वाढवले आहे. लीग शिल्ड सोबत मुंबई सिटीला आयएसएल जेतेपदही खुणावत आहे.
हिरो आयएसएल मधील मुंबई सिटी एफसीच्या स्वप्नवत वाटचालीला बंगळुरू एफसीनेच ब्रेक लावला आणि त्यांनी 18 सामन्यांतील अपराजित मालिका खंडित केली. साखळी फेरीत 20 सामन्यात अपराजित राहून नवा विक्रम नोंदवण्याची संधी मुंबई सिटीकडे होती, परंतु ती हुकली. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात मुंबईला घरच्या मैदानावर ईस्ट बंगाल एफसी कडून हार मानावी लागली. मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी या सामन्यात दुसऱ्या फळीतील संघ मैदानावर उतरवला होता. पण, उद्याच्या सामन्यात ग्रेग स्टीवर्टसह सर्वोत्तम खेळाडू बकिंगहॅम मैदानावर उतरवणार आहेत. स्टीवर्ट दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकला होता.
”सेमी फायनलच्या दोन लेग सामन्यांकडे मी दोन वेगवेगळ्या व्यक्तिंचा खेळ म्हणून पाहतो. तुम्हाला 90 मिनिटांची रणनीती आखावी लागले आणि पहिल्या हाफमधील कामगिरीचा मध्यंतरानंतर परिणाम होतो, याची कल्पना तुम्हाला असते. त्यामुळे जर तुम्ही पहिल्याच भागात दमदार खेळ केलात तर दुसऱ्या भागाकडे पाहण्याची गरजच नाही, या संपूर्ण पर्वात जसा आम्ही खेळ केला, तोच या सामन्यात कायम राखणार आहोत. आम्हाला त्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी मिळाला आहे. आता सर्व खेळाडू तंदुरूस्त झाले आहेत,”असे बकिंगहॅम म्हणाले.
सलग 9 विजयांसह बंगळुरू एफसीची उपांत्य फेरीत धडक
या पर्वाच्या सुरुवातीला बंगळुरू एफसीला मुंबईच्या घरच्या मैदानावर 4-0 असा पराभव पत्करावा लागला होता आणि हे त्यांच्या चांगलेच लक्षात असेल. पण, बंगळुरूने सलग 9 विजय मिळवताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य प्रशिक्षक सायमन ग्रेसन हे उद्याच्या सामन्यात कोणताच बदल करणार नाहीत. रॉय कृष्णा व शिवा नायारणन या दोन खेळाडूंकडून त्यांना अपेक्षा आहेत.
”मुंबई सिटीची अपराजित मालिका खंडित करणारे आम्ही होतो, यंदाच्या पर्वात त्यांना प्रथम पराभूत करणारे आम्ही आहोत आणि हिच आमचा आत्मविश्वास उंचावणारी गोष्ट आहे. त्यांच्याविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी केली आहे, परंतु या खेळात मागील सामन्याला काही अर्थ नसतो. उपांत्य फेरीच्या या दोन लेग सामन्यांत दडपण कसे हाताळतो, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल, शिवाय थोड्या नशिबाची साथ हवी,”असे ग्रेसन म्हणाले.
हिरो आयएसएलमध्ये उभय संघांमध्ये 12 लढती झाल्या आणि त्यापैकी 6 मुंबईने, तर 5 बंगळुरूने जिंकल्या आहेत. 2018मध्ये एकमेव सामना ड्रॉ राहिला होता. (Mumbai City FC is preparing for a ‘double’ blast! They will face Bengaluru FC in the semi-final leg 1)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“अशा खेळपट्ट्या बनवून तुम्ही स्वतःची कमजोरी लपवता”, दिग्गजाचा टीम इंडियाला घरचा आहेर
रोनाल्डोच्या दातृत्वाचा आणखी एक दाखला! तुर्कीतील भूकंपग्रस्तांची जबाबदारी घेतली खांद्यावर, केली तब्बल इतकी मदत