---Advertisement---

भारतीय संघाचा ‘स्टार स्ट्रायकर’ मुंबई सिटी एफसीकडे ; प्रशिक्षक लोबेरो यांनी केली घोषणा

---Advertisement---

इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलमधील मुंबई सिटी एफसीने भारतीय फुटबॉल संघाचा युवा स्ट्रायकर फारुख चौधरी याच्यासमवेत तीन वर्षाचा करार केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुंबई सिटी एफसीचे मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लोबेरो यांनी शुक्रवारी(१६ ऑक्टोबर) केली.

मुंबई उपनगरातील अंबरनाथचा रहिवासी असलेला २३ वर्षीय फारुख दोन्ही बगलेतून सहाय्यकाची तसेच मध्यभागी राहून स्ट्रायकरची भूमिका बजावू शकतो. फारुख याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात डायमंड्स फुटबॉल क्लबपासून केली. पुढे, एअर इंडियाच्या १५ वर्षाखालील संघाचा तसेच, सेंट्रल बँक ऑफ इंडिया संघाचा तो सदस्य राहिला. पुणे एफसीच्या १९ वर्षाखालील संघासोबत बराच वेळ राहिल्यानंतर, २०१६-१७ हंगामासाठी फारुखने लोनस्टार काश्मीर एफसीसोबत करार केला होता.

मुंबई सिटी एफसीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर, फारुखने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, “स्वत: च्या शहरातील सर्वात मोठ्या क्लबचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे, यासारखा आनंद असू शकत नाही. मला संघात निवडल्याबद्दल मी मुंबई सिटी एफसीचे आभार मानतो. माझ्या कारकीर्दीच्या या महत्वाच्या टप्प्यावर मला मुंबई सिटीसारखा संघ मिळाला, याबाबत मी स्वतःला भाग्यशाली मानतो. एक फुटबॉलपटू म्हणून माझा विकास होण्यासाठी ही योग्य जागा आहे. मी माझ्या आयुष्याचा हा नवीन अध्याय सुरू करण्यास उत्सुक आहे.”

https://twitter.com/MumbaiCityFC/status/1317019954089250818

२०१६ मध्ये त्याने केरळा ब्लास्टर्स संघाकडे कराराबाबत बोलणी केली होती. मात्र, तेव्हा तो आयएसएल पदार्पण करण्यात अपयशी ठरला होता. २०१७ च्या आयएसएल ड्राफ्टद्वारे जमशेदपूर एफसीमध्ये सामील होण्यापूर्वी, फारुखने मुंबई एफसीसाठी आय-लीगमध्ये घाम गाळला होता. फारुखने तीन आयएसएल हंगामात जमशेदपूर एफसीचे ४४ सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावे ३ आयएसएल गोल जमा आहेत.

इंडियन सुपर लीगच्या सातव्या हंगामापूर्वी मुंबई सिटी एफसीने याच आठवड्यात विक्रम प्रताप सिंह व मंदार राव देसाई यांच्याशी करार केला आहे. फारुखच्या आगमनाने, मुंबईची भारतीय खेळाडूंची फळी सुदृढ भासत आहे.

वाचा –

शेफील्ड युनायटेडच्या मालकाने खरेदी केला भारतीय फुटबॉल क्लब; ‘हे’ आहे क्लबचे नवीन नाव

आयएसएल संघ पोहोचले गोव्यात; ‘या’ चार संघांनी सराव केला सुरू

ISL: लिव्हरपूलचा दिग्गज बनला ईस्ट बंगालचा प्रशिक्षक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---