मुंबई: मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत कुमार आणि किशोर गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती – अ आणि स्वामी समर्थ स्पोर्ट्स यांनी किशोरी, तर शिवशक्ती – अ आणि शिवशक्ती – ब यांनी कुमारी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीचे सर्व (कुमार/कुमारी, किशोर/किशोरी) सामने मुख्य निवड चाचणी जेव्हा ऑक्टोम्बर २०१८ मध्ये घेण्यात येईल त्यावेळी खेळविण्यात येतील.
वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या पटांगणावर संपन्न झालेल्या किशोरी गटाच्या उपांत्य सामन्या शिवशक्ती -अ ने महर्षी दयानंदला ४१-११असे नमवित धडाक्यात अंतिम फेरी गाठली.
पहिल्या डावात २५-०६अशी आश्वासक आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने दुसऱ्या डावात देखील जोरदार खेळ करीत हा विजय सोपा केला. मानसी पाटील, रतिका, राणी गुप्ता यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते.
रिया मडकईकर, दीक्षा सिंग यांचा खेळ या सामन्यात बहरला नाही, त्यामुळे महर्षी दयानंदला या सामन्यात हार पत्करावी लागली. दुसऱ्या सामन्यात स्वामी समर्थने ओम् ज्ञानदीपला ५८-१३ असे झोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली.
पूर्वार्धात ३२-०१अशी भक्कम आघाडी घेत स्वामी समर्थने आपला विजय निश्र्चित केला होता. उत्तरार्धात त्यात २६गुणांची भर टाकत सामना आरामात आपल्या नावे केला. रितू व मानसी यांच्या धडाकेबाज खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ओम् ज्ञानदीपची आंचल हिने बऱ्यापैकी लढत दिली.
कुमारी गटाच्या उपांत्य सामन्यात शिवशक्ती -अ ने जिजामाता स्पोर्ट्सचा ५९-१२ असा धुव्वा उडवित अंतिम फेरी गाठली. अमरहिंदला ३०-२८ असे नमविणाऱ्या त्यांच्याच शिवशक्ती – ब संघाशी त्यांची अंतिम लढत होईल.
शिवशक्ती – अ ने मात्र विश्रांती पर्यंत २४-०८अशी आघाडी घेत विजयाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते. विश्रांतीनंतर आणखी जोशपूर्ण खेळ करीत ४७ गुणांनी सामना जिंकला. रुणाली भुवड, प्रतीक्षा तांडेल यांच्या जोशपूर्ण खेळाला या विजयाचे श्रेय जाते.
जिजामाताची प्रीती हांडे बरी खेळली. शिवशक्ती – ब संघाला मात्र अमरहिंदने कडवी लढत दिली. शेवटी ३०-२८अशा २गुणांनी शिवशक्ती – ब संघाने हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली. ज्योती डफळे, प्राची भादवणकर यांनी उत्कृष्ट खेळ करीत शिवशक्तीला मध्यांतराला २१-०८अशी आघाडी मिळवून दिली होती.
मध्यांतरानंतर अमरहिंदच्या दिव्या रेडकरला सूर सापडला. तिने भराभर गुण घेत ही आघाडी कमी करीत आणली. पण यात तिला अन्य कोणाची साथ न लाभल्यामुळे शेवटी त्यांना २गुणांनी पराभवाला सामोरी जावे लागले.
या अगोदर झालेल्या किशोरी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात शिवशक्ती अ ने चंद्रोदयला (५६-१३), महर्षी दयानंदने डॉ. शिरोडकरला (६०-४७), स्वामी समर्थने अमरहिंदला (६९-४५), तर ओम् ज्ञानदीपने चुरशीच्या लढतीत शिवशक्ती ब ला (४७-४५)असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली होती.
कुमारी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात शिवशक्ती अ ने अमरहिंद ब ला (५२-०७), जिजामाता स्पोर्ट्सने गोलफादेवीला (५४-३८), शिवशक्ती ब ने अमर भारतला (३९-०४), तर अमरहिंदने अत्यंत कडव्या लढतीत डॉ. शिरोडकरचा (३८-३७)असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.