मुंबई इंडियन्सला आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. कारण त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त ४ वेळा (२०१३, २०१५, २०१७ व २०१९) आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या व्यतिरिक्त संघ २०१०मध्ये अंतिम सामन्यात पोहचला होता. तसं बघायला गेलं तर मुंबईसाठी सुरुवातीचा काळ चांगला गेला नाही. पण २०१० पासून संघाने चांगले प्रदर्शन केलं आहे.
आयपीएल (Indian Premier League) इतिहासात असे फक्त दोनच संघ आहेत. ज्यांनी १०० पेक्षा जास्त विजय मिळवले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यामध्ये १ नंबरला आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) २ नंबरला आहे.
या दरम्यान मुंबईचे असे काही सामने झाले आहेत. ज्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले आहे. त्या सामन्यांबद्दल या लेखात जाणून घेणार आहोत.
आयपीएल २०१९ अंतिम सामना – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएलच्या १२ व्या हंगामाचा अंतिम सामना १२ मे २०१९ ला हैद्राबाद येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात येथे खेळण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ८ बाद १४९ धावा केल्या होत्या. एवढ्या धावा बघून असं वाटत होतं, की सीएसके हा सामना सहज जिंकेल.
मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेकडून शेन वॉटसनच्या (Shane Watson) ८० धावांचा खूप फायदा झाला. त्याच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने विजयाच्या दिशेने पाठलाग केला. चेन्नईला शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती, त्यावेळी दोन धावा काढण्याच्या नादात वॉटसन धावबाद झाला.
शेवटी एका चेंडूत दोन धावांची गरज असताना चेंडू अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) हातात होता. आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) फलंदाजी करत होता. त्यावेळी सर्वांच्या काळजाचा ठोका थांबला होता. विजेतेपद कोण पटकावणार ते या चेंडूवर ठरणार होते. परंतु मलिंगाने शेवटच्या चेंडूत शार्दूलला पायचीत केलं. आणि मुंबईने एका धावेने विजय मिळवून चौथे विजेतेपद आपल्या नावावर केले.
आयपीएल २०१७ अंतिम सामना- मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स
आयपीएलच्या १० व्या हंगामातील अंतिम सामना २१ मे २०१७ ला हैद्राबाद येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स (Rising Pune Supergiants) संघात खेळण्यात आला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करत कृणाल पंड्याच्या ४७ धावांच्या जोरावर १२९ धावसंख्या उभी केली होती.
या धावसंख्येचा पाठलाग करताना सुपरजायंट्सने १९ षटकांत ११९ धावा केल्या. सुपरजायंट्सला शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती. चेंडू मिचेल जॉन्सनच्या (Mitchell Johason) हातात चेंडू होता. त्यावेळी मनोज तिवारी (Manoj Tiwari) फलंदाजी करत होता. तसेच, पहिल्याच चेंडूत चौकार ठोकल्यामुळे सुपरजायंट्सचा विजय निश्चित मानला जात होता. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या या दोन जादुई चेंडूवर तिवारी आणि स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) बाद करून सामन्याचं पूर्ण चित्रच पालटलं. शेवटच्या चेंडूत ४ धावांची गरज असताना डॅनियल ख्रिश्चनने (Daniel Christian) चेंडू मारला, पण त्यावर दोनच धावा मिळाल्या आणि मुंबईने १ धावेने विजय मिळवला होता.
आयपीएल २००८ – मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
आयपीएलच्या पहिल्या हंगामातील ४५वा सामना २१ मे २००८ साली मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघात खेळण्यात आला होता. तो सामना अत्यंत रंजक होता. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना शॉन मार्शच्या (Shaun Marsh) ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर १८९ धावसंख्येचे विशाल लक्ष्य उभे केले होते.
पंजाबच्या १९० धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकडून सचिन तेंडुलकरने ६५ धावांची अर्धशतकीय खेळी केली. पंजाबचे क्षेत्ररक्षण आणि मुंबईची फलंदाजी यामुळे सामना कोणाकडे जाईल, हे सांगता येत नव्हतं. युवराज सिंगने १८ व्या षटकात चांगली गोलंदाजी करत दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुंबईला दोन धावांची गरज होती. परंतु युवराजने फलंदाजाला धावबाद करत. पंजाबला १ धावेने विजय मिळवून दिला होता.