शनिवारी (१७ एप्रिल) झालेल्या आयपीएलच्या ९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने सलग दुसरा विजय मिळवत सनरायझर्स हैदराबाद संघाला १३ धावांनी पराभूत केले. यासोबतच मुंबई इंडियन्स संघाने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्स संघाचा सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर मैदानात ‘पोलार्ड पॉवर’ पाहायला मिळाली होती. मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर १५० धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आणि त्यांचा पूर्ण संघ १९.४ षटकात १३७ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना मुंबई इंडियन्स संघाने १३ धावांनी आपल्या नावावर केला. यासोबतच मुंबई इंडियन्स संघ आयपीएलच्या इतिहासात पहिला असा संघ ठरला आहे, ज्या संघाने विरोधी संघाला सर्वाधिक २९ वेळा पराभूत केले आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ देखील टॉप-३ मध्ये आहेत.
प्रतिसपर्धी संघाला सर्वाधिक वेळा पराभूत करणारे संघ
मुंबई इंडियन्स – २९ वेळा
चेन्नई सुपर किंग्ज -२० वेळा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर -१७ वेळा
मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजांची कमाल
मुंबई इंडियन्स संघाने दिलेल्या १५१ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सलामी फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. सुरुवातीच्या ७ षटकात मुंबई संघाला एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यांनतर कृणाल पंड्याला त्यांची सलामी जोडी तोडण्यात यश आले होते. पुढे मुंबई संघाकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर राहुल चाहर या सामन्यात देखील चमकला. त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले होते. तसेच जसप्रीत बुमराह आणि कृणाल पंड्या यांना १, १ गडी बाद करण्यात यश आले.
याबरोबरच अष्टपैलू हार्दिक पंड्याने हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि अब्दुल समद यांना धावबाद करत महत्वाचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर
संपूर्ण यादी: आत्तापर्यंत ‘हे’ १२ क्रिकेटर आयपीएलमध्ये झाले आहेत हिट विकेट; जडेजा, युवराजचाही समावेश