पुणे। मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात बुधवारी (१३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मधील २३ वा सामना पार पडला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव झाला. हा मुंबई इंडियन्सचा सलग ५ वा पराभव ठरला आहे. या पराभवाबरोबरच मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारासह संपूर्ण संघाला दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स संघाला दंड
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने (MI vs PBKS) षटकांची कमी राखल्याने कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) संघातील खेळाडूंना दंड झाला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार षटकांची गती कमी राखण्याची (Slow Over Rate) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) ही १५ व्या हंगामातील दुसरी वेळ होती. त्याचमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर २४ लाखांचा आणि अंतिम ११ जणांच्या संघातील खेळाडूंवर ६ लाख रुपयांचा किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के, जो कमी असेल तो दंड आकारण्यात आला आहे.
यापूर्वी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या हंगामातील (IPL 2022) त्यांच्या पहिल्या सामन्यात देखील षटकांची गती कमी राखली होती. त्यामुळे रोहितवर तेव्हा १२ लाख रुपयांचा दंड झाला होता.
रोहितवर बंदीची टांगती तलवार
आयपीएलच्या नियमांनुसार षटकांची गती कमी राखण्याची चूक हंगामात पहिल्यांदा झाल्यास त्या संघाच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड होतो. हीच चूक दुसऱ्यांदा झाल्यास कर्णधारासह संघातील खेळाडूंनाही दंड भरावा लागतो. यावेळी कर्णधाराला २४ लाख आणि संघातील अन्य खेळाडूंना ६ लाख रुपयांचा किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के, जो कमी असेल तो दंड ठोठावण्यात येतो.
पण, हंगामात षटकांची गती कमी राखण्याची चूक तिसऱ्यांदा झाली, तर कर्णधारावर ३० लाख रुपयांचा दंड होतो आणि त्याचबरोबर एका सामन्याची बंदी घातली जाते. तसेच अंतिम ११ जणांच्या संघात सामील असलेल्या खेळाडूंवर १२ लाखांचा किंवा सामनाशुल्काच्या ५० टक्के, जो कमी असेल तो दंड करण्यात येतो.
त्यामुळे आता रोहितला आणखी एक चूक करणे महागात पडू शकते. कारण जर मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्यांदा षटकांची कमी गती राखली गेली, तर रोहितवर एका सामन्यासाठी बंदी येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आता तर सवयच झाली’, मुंबई इंडियन्सच्या सलग ५ व्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल राजस्थान वि. गुजरात सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| राजस्थान वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!






